जालना : शहरात आज अपहरण आणि सुटकेची थरारक घटना घडली आहे. सीबीएसई बोर्डाची शेवटचा पेपर देण्यासाठी आलेल्या एका मुलाचे अपहरण करण्यात आले होते. पण पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत मुलाची अवघ्या ५ तासांमध्ये सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालना शहरात भरदिवसा एका व्यावसायिकाच्या दहावीत शिकणा-या मुलाचे शाळे बाहेरून अपहरण करून तब्बल ४ कोटीची खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी मुलाला शोधण्यात यश आले असले तरी अपहरणकर्ते मात्र अद्यापही पोलिसांना सापडू शकले नाहीत.
शहरातील व्यावसायिक महावीर गादिया यांचा १६ वर्ष वयाचा मुलगा स्वयंम गादिया हा १० वीची परीक्षा देण्यासाठी पोद्दार शाळेच्या परीक्षा केंद्रावर गेला होता. मात्र, साडेबारा वाजता परीक्षा संपूनही तो परत आला नाही, म्हणून पालकांनी ड्राइव्हरच्या मोबाईल फोनवर कॉल केला. त्यावेळी एका अपहरणकर्त्याने फोन उचलला आणि मुलगा हवा असल्यास चार कोटी रुपये आणून देण्याची मागणी केली.
महावीर गादिया यांनी लगेच या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली. यावेळी पोलिसांनी जिल्ह्यात मुख्य रस्त्यावर नाकाबंदीकरून चालकाचा मोबाईल ट्रेस केला. त्यानंतर सदर मुलगा अंबड रोडवरील शहापूरजवळ चालकासह आढळून आला. पोलिसांनी तातडीने महावीर गादिया यांच्या मुलाला ताब्यात घेतले. पण तोपर्यंत अपहरणकर्ते फरार झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. चालकाला मदत करणा-या अपहरणकर्त्याचा पोलिस शोध घेत आहेत.