मंगळवेढा : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने तालुक्यात कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी त्यांच्या विविध प्रश्नांसाठी संपावर गेल्या असून, मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून त्याबाबतचे निवेदन तहसीलदार मदन जाधव यांना दिले.
दुष्काळसदृश तालुक्यात असलेल्या अंगणवाडीच्या माध्यमातून कुपोषित बालके व गरोदर महिलांना देण्यात येणा-या शालेय पोषण आहारावर या संपाचा परिणाम जाणवला. अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी त्यांचे प्रश्न सोडवावेत यासाठी प्रशासनाला ६, १४ व २७ नोव्हेंबर रोजी निवेदन दिले होते. परंतु त्यांच्या मागण्यांवर कोणताही निर्णय न झाल्याने ४ डिसेंबरपासून त्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्यांनी मोर्चा कातून निवेदन दिले.
या निवेदनामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अपिलामधील २५ एप्रिल रोजी ग्रॅच्युईटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी, अंगणवाडी कर्मचारी हे वैधानिक पद असून त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच आहे, तरी त्यानुसार त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्यानुषंगाने येणारी वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षांचा लाभ द्यावा, अंगणवाडी सेविका व मदतनिसांना त्वरित भरीव मानधनवाढ जाहीर करावी, मदतनीस व सेविकांचे मानधन किमान १८ ते २६ हजारांपर्यंत असावे, सेविका व मदतनिसांच्या मानधनात १०० ला ७५ असे प्रमाण असावे.
मानधन महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करावी, महिला व बालविकास मंत्र्यांशी चर्चा झाल्यानुसार विना योगदान मासिक निर्वाह भत्ता (पेन्शन) सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात मंजूर करवून घ्यावा, महानगरपालिका क्षेत्रातील जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी किमान पाच ते आठ हजार भाड़े मंजूर करावे. आहाराचा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६ व अतिकुपोषित पालकांसाठी २४ रुपये असा करावा. अशा मागण्या करण्यात आल्या.
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या प्रश्नांकडे शासन वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने आमच्यावर सतत अन्याय होत आला. अगदी तुटपुंजा मानधनात कामे मात्र भरपूर लावली जातात आता आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही लढत राहणार आहे.असे अंगणवाडी सेविका संघटना तालुकाध्यक्षा पार्वती स्वामी यांनी सांगीतले.