लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना आता त्याचे भीषण परिणाम नदीपात्रातही दिसू लागले आहेत. कधीकाळी शेतशिवार हिरवीगार करणा-या मांजरा-तावरजा नदीपात्रात पाण्याअभावी माशांचा मृत्यू होत असून, नदीकाठावर मृत माशांचा खच साचला आहे. दुसरीकडे, गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच बंधारा कोरडा पडल्याचं चित्र समोर आले आहे. त्यामुळे परिसरातील पाणीटंचाईचं संकट अधिक गंभीर झाले आहे.
लातूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने नदी, नाले आणि तलावांमधील पाणीसाठा कमी होत आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत असून, त्याचा फटका जलचरांनाही बसत आहे. मांजरा-तावरजा नदीपात्रातील मृत माशांचं दृश्य दुष्काळाच्या भीषणतेची जाणीव करून देत आहे.
एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, तर दुसरीकडे शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाण्याअभावी जलचरांचा मृत्यू होत असल्याने पर्यावरणीय संकटाची चिंताही वाढली आहे.
दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच बंधारा कोरडा
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून परिसरातील पाणीपातळी वाढवण्यासाठी नदीवर बंधारे उभारण्यात आले होते. या बंधा-यांमुळे शेतीला पाण्याचा आधार मिळाला आणि परिसरातील शेतीला चालना मिळाली. मात्र, यंदाच्या दुष्काळामुळे बंधा-यातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. दहा वर्षांत पहिल्यांदाच बंधारा कोरडा पडला आहे. दुष्काळाचा सामना करणा-या लातूर जिल्ह्यात आता माणसांसोबत मुक्या जीवांवरही मोठे संकट आले आहे.
















