लातूर: प्रतिनिधी
लातूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील उद्योग भवन परिसरातील ‘उमाटे इंटरनॅश्नल कुरिअर’ येथे आज दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १०:३० दरम्यान बाहेरून आलेले पार्सल उतरवून घेत असताना टेम्पोमध्ये अचानक भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत पार्सल उतरवित असणारी व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे.
या घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिस, बॉम्बशोधक व नाशक पथक, एटीएस पथक, आणि फॉरेन्सिक पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झालेअसून कसून तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्राथमिक माहितीनुसार पार्सलमधून गण पावडर व आढलेल्या बंदुकीतली छर्रे यांच्या घर्षणाने स्फोट झाल्याचा अंदाज आहे. हे स्फोटक साहित्य कुणाचे आहे? ते कशासाठी आणण्यात आले होते? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिस सर्व बाजूने तपास करत आहेत. या स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तीला पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
















