Homeसोलापूरसोलापूर महापालिकेच्या प्रसुतीगृहांचे नुतनीकरण होणार

सोलापूर महापालिकेच्या प्रसुतीगृहांचे नुतनीकरण होणार

सोलापूर : शहरात महापालिकेचे आठ प्रसूतिगृह आहेत. त्यापैकी डफरीन चौकातील नूतनीकरणानंतर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक आधार मिळतो आहे. एका दिवसाला ५० जणांवर रुग्णालयात उपचार देण्याची सुविधा आहे. २४ तास दवाखाना चालू असून, तीन पाळ्यात डॉक्टर, नर्ससह इतर कर्मचारी उपलब्ध आहेत. प्रसूतिसह महिलांच्या संबंधी असलेले सर्व आजारांवरही तपासणी आणि उपचार या ठिकाणी होतात. याच पद्धतीने इतर हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचे कामही हाती घेण्यात येणार आहे. असे प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी सांगीतले.

शहरातील महापालिकेच्या एकूण आठ प्रसूतिगृहापैकी अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहात खासगी दवाखान्याच्या धर्तीवर दहा महिन्यापूर्वी सुशोभीकरण करण्यात आले. याचा सर्वाधिक लाभ हे हद्दवाढ भागातील कामगार महिलांना झाला आहे. या कालावधीत २६ हजार १११ महिलांची तपासणी तर ४ हजार ९३८ गर्भवतींवर उपचार करून १ हजार ५५० जणांची प्रसूती करण्यात आली आहे.

शहरातील दवाखान्याची स्थिती म्हणजे तळीरामांचा अड्डा आणि अस्वच्छतेमुळे आजाराचे केंद्र बनले होते.गेल्या २५ वर्षात या महापालिका प्रसूतिगृहामध्ये सिझेरियन बंद होते. नॉर्मल प्रसूती ही महिन्यातून क्वचितच एखादी होत असते, अर्धवेळ डॉक्टर, तपासणीसाठी कोणतीही अत्याधुनिक मशिनरी नाही, पिण्यासाठी पाणी नाही,सर्वत्र अस्वच्छतेचा आगार आदी समस्यांच्या विळख्यात अडकलेले हे प्रसूतिगृह होते. आठ केंद्रापैकी एका केंद्राचे सुशोभीकरणाचे काम हाती घेतले. २४ फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिका आणि उद्योजकांच्या सीएसआर फंडातून डफरीन प्रसुतिगृह दीड कोटी रुपये खर्चुन खासगी दवाखान्यांच्या धर्तीवर दर्जेदार इमारत आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करू दिले.

गेल्या १० महिन्यात या हॉस्पिटलचा सर्वाधिक लाभ हे विविध क्षेत्रातील कामगार महिलांना घेतला आहे. आतापर्यंत या दवाखान्यात ओपीडी तपासणीसाठी आणि प्रसुतीसाठी नाव नोंदविलेल्या महिलांची संख्या ही विडो घरकूल, सोरेगाव, शेळगी यांसह हद्दवाढ भागातील सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. २५ वर्षांपासून बंद असलेले सिझेरियनसह नॉर्मल प्रसूतिंची संख्या अधिक आहे. महापालिकेने डफरीन चौकातील दवाखान्याची सुधारणा करून आतापर्यंत दिलेल्या उपचारापोटी तुलना करता साधारण सोलापूकरांचे पाच कोटी रुपये वाचविले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR