पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाल्यामुळे काल भुयारी मेट्रो मार्गाचे उद्घाटन झाले नव्हते. दरम्यान आज दीवानी न्यायालय स्टेशनवर महाविकास आघाडीने आंदोलन करत, शिवाजीनगर-स्वारगेट भुयारी मेट्रो मार्ग सुरू करण्याची मागणी करत आहेत.
यावेळी विविध राजकीय पक्षांच्या नेते कार्यकर्त्यांसह हजारो नागरिकही आंदोलन स्थळी उपस्थितीत होते. यावेळी मेट्रो सुरू न करणा-या मोदी आणि भाजपचा धिक्कार असो, अशा घोषणा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करत होते. दरम्यान २६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचा उद्घाटन सोहळा पार पडणार होता. मात्र, त्यादिवशी पुण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे या मार्गाचे उद्घाटन न झाल्याने सेवाही सुरू करण्यात आली नाही. काम झाले असूनही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले नाही म्हणून प्रवासी सेवा बंद ठेवल्यामुळे शहरात संताप निर्माण झाला होता. त्यानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर, माजी महापौर आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय मोरे यांनी पुढाकार घेत दिवानी न्यायालय मेट्रो स्टेशनवर धडक देत स्वारगेटपर्यंतची सेवा सुरू करण्याची मागणी केली.
२९ सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन
दरम्यान यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या मार्गाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा मार्ग ज्येष्ठांच्या हस्ते फित कापून सुरू करावा अशी मागणी केली. पण अधिका-यांनी आणि पोलिसांनी लवकरात लवकर हा मार्ग सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले. २६ तारखेचा दौरा रद्द झाल्यानंतर आता पंतप्रधान २९ सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे उद्घाटन करणार आहेत.