पुणे : प्रतिनिधी
राज्य शासनाला विविध पातळींवर अपयश येत असून आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढणार असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार निवडणुकीनंतर सत्तेवर येईल असा विश्वास काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांच्या आढावा बैठकीसाठी ते येथे आले आहेत त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,आदी यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आघाडी प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. राज्यातील वातावरण बिघडत आहे, समाजातील विविध घटकांचे प्रश्न सुटले नाहीत. शासनाचे त्याकडे लक्ष नाही. या सर्व बाबी निवडणुकीच्या प्रचारात जनतेसमोर मांडल्या जाणार आहेत. याचा परिणाम म्हणून आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले की, राज्यातील अति पावसाचा शेतीवर परिणाम होत असून याबाबत राज्य शासनाने तातडीने सर्वेक्षण करून शेतकरीवर्गाला मदत द्यावी. तसेच एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाचा प्रश्न अद्याप निकाली निघाला नाही. याबाबत नोटिफिकेशन निघाले नाही, जी आश्वासने देण्यात आली त्यांची पूर्तता करण्यात आली नाही. तसेच राज्यात महिला वर्गाची असुरक्षितता आहे त्याबाबत उपाययोजना होत नाही, केवळ इव्हेंट करण्यावर भर दिला जातो आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात येतो आहे. राज्यात निवडणुकीनंतर बदल घडावा अशी जनतेची इच्छा आहे, असे ते म्हणाले.