रायगड : रायगड जिल्ह्यातील खोपोलीत इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली एमडी ड्रग्जचा कारखाना चालवला जात होता. पोलिसांनी या एमडी ड्रग्ज बनवणा-या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या या धाडीत १०६ कोटी ५० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. तसेच मोस्ट वॉन्टेडसह तिघांना अटक करण्यात आली आहे. ६५ लाखांच्या यंत्रसामुग्रीसह १०७ कोटी रुपयांचा मुद्देमाल यात जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
पोलीस पथकाने या कारखान्यावर धाड टाकली. कंपनीच्या चालकाकडे सदर ठिकाणी रासायनिक पदार्थ निर्मिती करणेसाठी आवश्यक असणारा शामनाचा कोणताही वैध परवाना सापडला नाही. त्या ठिकाणी उग्र वास येत होता. येथे काही कच्चा माल, तसेच त्याचेवर प्रक्रीया करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री असेंबल केल्याचे दिसुन आले. यामध्ये गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परीणाम करणारे पदार्थ अधिनियमातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात आली.
खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील मौजे ढेकु गावच्या हद्दीत इंडीया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्वरींग कंपनी या नावाचा बोर्ड लावुन हा ड्रग्जचा कारखाना चालवला जात होता. प्रत्यक्षात मात्र अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणा-या कंपनीमध्ये प्रतिबंधीत केलेले अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात होते. खोपोली पोलीसांना या कारखान्याबाबत गोपनीय माहीती मिळाली होती. यानंतर या कारखान्यावर धाड टाकण्यात आली.