मुंबई : प्रतिनिधी
राज्यात भीषण दुष्काळ पडला असून, मराठवाडा, विदर्भातील स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. शेतक-यांचा खरीप हंगाम तर वाया गेला. त्यानंतर रबी हंगामदेखील हातातून गेला आहे. या अभूतपूर्व संकटात राज्य सरकारने भरघोस मदत जाहीर करणे आवश्यक होते. परंतु आधी नियमावलीचे कारण सांगून दिवाळीआधी शेतक-यांना मोठी मदत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, आता पंचनाम्याचे कारण पुढे करून केंद्राच्या मदतीला विलंब होणार असल्याचे सांगत दिवाळीआधी शेतक-यांच्या खात्यात ५ हजारांवर बोळवण करण्याचा निर्णय घेतला. भीषण दुष्काळ आणि महागाईचा उच्चांक पाहिला तर ही अत्यंत तुटपुंजी रक्कम असून ही शेतक-यांची थट्टा आणि फसवणूक आहे. शेतकरी काय भिकारी आहे का, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकरीदेखील तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
राज्य सरकारने पीक पंचनाम्याचे आदेश देताना दिवाळीआधी शेतक-यांना मोठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे संकटग्रस्त शेतक-यांना तातडीने मोठ्या मदतीची अपेक्षा होती. परंतु आधी ५ ऑक्टोबरच्या डेडलाईनची नियमावली सांगितली. परंतु शेत शिवारात सध्या सर्वत्र धुरळा असताना सरकारने पंचनाम्याचे कारण दिले आणि आता पंचनाम्याला विलंब लागतोय, त्यामुळे दिवाळीआधी मोठी मदत देता येणार नाही, म्हणून अग्रिम रकमेच्या नावाखाली शेतक-यांची दिवाळीआधी केवळ ५ हजारांत बोळवण करण्याचा काल निर्णय जाहीर केला.
त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांसह शेतकरी नेते, शेतक-यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सरकारच्या या घोषणेचा निषेधही केला. त्यामुळे शेतक-यांमध्ये सरकारबद्दल संतापाची भावना निर्माण झाली असून, राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशा शब्दांत फडणवीस सरकारवर टीकास्त्र होत आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी राज्य सरकारने ६ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजनुसार दिवाळीपूर्वी शेतक-यांना ५ हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याची घोषणा केली. या निर्णयावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ५ हजार रुपयांची मदत म्हणजे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे म्हटले. ही मदत तुटपुंजी असून शेतक-यांच्या भावनेशी खेळ असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
सरकारचे धोरण शेतकरीविरोधी
दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची मदत देऊन शेतक-यांची दिशाभूल केली जात आहे. आंदोलन आणि मोर्चांपासून शेतक-यांचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकार हा डाव खेळत आहे. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, त्यांना तुटपुंजी मदत नव्हे तर हेक्टरी १ लाख रुपयांचे अनुदान मिळणे आवश्यक आहे. सरकारचे धोरण शेतकरी हिताचे नाही, सरकारच्या ५ हजारांसाठी शेतक-यांना बँकेच्या दारात उभे राहावे लागणार आहे. ही शेतक-यांची थट्टा आहे, अशा शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी टीकास्त्र सोडले.
भरघोस मदतीऐवजी राज्य सरकारकडून लंगडे समर्थन
महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची स्थिती १९७२ पेक्षा भयान आहे. शेतक-यांच्या हातात ना खरीप लागला, ना रबीचा हंगाम. त्यामुळे शेतकरी अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडला आहे. अशावेळी नियम बाजूला ठेवून तातडीने मदतीचा हात दिला पाहिजे. परंतु सरकार भीषण परिस्थितीतही हात आकडता घेऊन उलट उपकाराची भाषा करीत आहे. देशात प्रचंड महागाई वाढली आहे. आता खर्चाची हातमिळवणी कशी करायची, याची शेतक-यांना चिंता आहे. अशावेळी कर्नाटकपेक्षा आम्ही अधिक मदत देत असल्याचे सांगून ५ हजारांच्या मदतीचे लंगडे समर्थन केले जात आहे. यावरून शेतक-यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शेतक-यांना तोकडी मदत, मग हजारो कोटींचा महामार्ग कसा?
दुष्काळाने ग्रस्त शेतक-यांना तुटपुंजी मदत दिली आहे. मग हजारो कोटींच्या महामार्ग प्रकल्पावर सरकार पैसे कुठून आणत आहे, असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला. नाशिक कुंभमेळ््यासाठी ३६ हजार कोटी दिले. शक्तीपीठासाठी ३२ हजार ६०० कोटी आणि भूसंपादनासाठी २० हजार कोटी खर्च करण्याची सरकारची तयारी आहे. मग शेतक-यांना अग्रिमच्या नावाखाली केवळ ६ हजार कोटी कसे, असेही जयंत पाटील म्हणाले. वाढत्या महागाईमुळे आधीच सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अशा स्थितीत सरकारने आर्थिक बाबींत अधिक शहाणपणाचे निर्णय घ्यावेत, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
















