मुंबई : प्रतिनिधी
दूध उत्पादकांना दूधदराबद्दल दिलासा देण्यासाठी प्रति लिटर ५ रुपयाचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केली होती. त्यानुसार १ जानेवारीपासून नवीन मस्टर सुरू झाले असले तरी दूध अनुदानाबाबत हालचाल झाली नसल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे. एवढेच नव्हे, तर दूध अनुदानाची फाईल अद्याप अर्थ विभागाकडेच पडून असल्याची धक्कादायक माहितीही किसान सभेने दिली. आता अनुदान आणि इतर मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास पुन्हा राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे.
राज्यात १ जानेवारीपासून दूध संकलनाचे नवीन मस्टर सुरू होते. या मस्टरमध्ये तरी दूध उत्पादकांना अशाप्रकारे अनुदान मिळेल, अशी अपेक्षा दूध उत्पादक शेतकरी बाळगून होते. मात्र, १ जानेवारी उलटून गेला आणि नवीन मस्टर सुरू झाले तरीसुद्धा अद्याप अशा प्रकारचे अनुदान शेतक-यांना देण्याबद्दल हालचाल झालेली नाही. अनुदानाची फाईल अर्थ विभागाकडेच पडून असून याबाबत अर्थ विभागाचा व मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्याशिवाय शासन आदेशसुद्धा काढला जाणार नाही, अशा प्रकारची माहिती समोर आली असून ही गंभीर बाब असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी म्हटले.
शेतकरी अडचणीत असताना अनुदान द्यायचे नाही आणि मार्च दरम्यान लीन सीजन सुरू झाल्यानंतर जेव्हा आपोआप दुधाचे दर वाढतात, तेव्हा अनुदान देण्याबाबत भूमिका घ्यायची हा सरकारचा वेळकाढूपणा शेतकरीविरोधी आणि दुध व्यवसायाला अत्यंत मारक असल्याचा आरोप नवले यांनी केला. सरकारने अधिक अंत न पाहता उद्या किंवा परवा होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय करावा. सहकारी दूध संघांबरोबरच खाजगी दूध संघांना दूध पुरवणा-या शेतक-यांनासुद्धा प्रतिलिटर पाच रुपयाचे अनुदान देण्याबाबतचा निर्णय घ्यावा, शेतक-यांना सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रतिलिटर ३४ रुपये दर देणे खाजगी व सहकारी दूध संघांना बंधनकारक करावे, तसेच पशुखाद्याचे दर कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशा प्रकारची मागणी किसान सभेने पुन्हा एकदा केली आहे.
सरसकट अनुदान द्या
राज्यातील ७२ टक्के दूध हे खासगी संस्थांना घातले जाते. त्यामुळे ७२ टक्के शेतकरी सरकारने घेतलेल्या दूध अनुदानाच्या निर्णयापासून वंचित राहणार असल्याचे अजित नवले म्हणाले. हा शेतक-यांवर मोठा अन्याय आहे. सरकारने भेदभाव न करता खासगी आणि सहकारी दूध संस्थांना दूध घालणा-या शेतक-यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी अजित नवले यांनी केली आहे.
…तर पुन्हा एकदा आंदोलन
सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी. याबाबत उद्याच्या बैठकीमध्ये ठोस निर्णय न घेतल्यास पुन्हा एकदा महाराष्ट्रभर आंदोलन उभे करण्याचा निर्णय किसान सभा जाहीर करत आहे, असे अजित नवले म्हणाले.