पुणे : प्रतिनिधी
या निवडणुकीत झालेला सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याआधी कधीही पाहायला मिळाला नव्हता. स्थानिक निवडणुकांत अशा घटना ऐकायला मिळतात. पण राज्याच्या निवडणुकांत असे चित्र कधी पाहायला मिळाले नव्हते. काही लोकांनी ईव्हीएम कसे सेट केले जाते, याचे आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते.
आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल, असे कधी वाटले नसल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. त्यांना भेटण्यासाठी शरद पवार आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, शरद पवार यांनी पहिल्यांदाच ही शंका उपस्थित केली आहे. ईव्हीएम मशिन हॅक होऊ शकते. आम्हाला काही लोकांनी त्याचे प्रेझेंटेशन दिले होते. पण आम्ही विश्वास ठेवला नाही. मात्र, आता ईव्हीएम हॅक होऊ शकते हे लक्षात आले आहे, असे सांगतानाच निवडणूक आयोगावर हल्ला चढवला आहे.
पुढे बोलताना पवार म्हणाले, फेरमतमोजणीत काय येते ते पाहू. यातून काही फार पुढे येईल अशी शंका वाटते. मतदानाच्या शेवटच्या २ तासांमधील जी आकडेवारी समोर येत आहे ती धक्कादायक आहे. बाळासाहेब थोरातांसह अनेकांनी अशी माहिती समोर आणली आहे. पुराव्यासह दिली आहे. त्याचा विचार करावा लागेल. काँग्रेस कार्यकारिणीची काल बैठक झाली. त्यात हा विषय झाला. इंडिया आघाडीने हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. सोमवार किंवा मंगळवारी ही चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
१५ टक्के मते सेट केली यावर आमचा आधी विश्वास बसत नव्हता. आता त्यात तथ्य आहे असे दिसायला लागले आहे, असेही त्यांनी सांगितले.
सत्ता आणि पैशाचा महापूर
या देशात निवडणुका झाल्या. त्यासंबंधीची अस्वस्थता देशातील सर्व भागात आहे. त्याबद्दलचे जनमत बाबांच्या आंदोलनातून व्यक्त होत आहे. कालच्या निवडणुका झाल्या त्यात सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर झाला. या गोष्टी पूर्वी झाल्या नव्हत्या. देशातील निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा वापर करून सर्व यंत्रणा हाती घ्यायची हे चित्र दिसले नव्हते. ते यावेळी महाराष्ट्रात दिसले.
जनतेतून उठाव होण्याची गरज
काल संसदेच्या बाहेर काही लोक भेटले. त्या सर्वांना जयप्रकाश नारायण यांची आठवण आली. आज कुणी तरी पाऊल टाकण्याची गरज आहे. हा लोकांमधील चर्चेचा सूर आहे. बाबा आढावांनी पुढाकार घेतला. ते स्वत: महात्मा फुलेंशी संबंधित वास्तूत बसले आहेत. एक प्रकारचा दिलासा बाबांच्या उपोषणाने सामान्य लोकांना मिळाला आहे. त्यांनी राजकीय कर्तव्य म्हणून भूमिका घेतली. त्यांनी एकट्याने भूमिका घेणे हे योग्य नाही. या प्रश्नावर जनतेचा उठाव झाला पाहिजे.
संसदेत बोलू देत नाहीत
ईव्हीएमवर लोक चर्चा करत आहेत, हे माहीत असताना संसदेत हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला तर त्यांना बोलू देत नाहीत. सहा दिवसांच्या अधिवेशनात विरोधक दोन्ही सभागृहांत आपले म्हणणे मांडण्यासाठी एक मागणी करत आहेत. पण सहा दिवसांत एकदाही मागणी मान्य झाली नाही. एवढेच नाही तर संसद बंद पाडले. या सहा दिवसांत देशाच्या प्रश्नांवर चर्चा होऊ दिली नाही. यावरून लोकशाही पद्धतीवर राज्यकर्त्यांनी आघात केला आहे, असा आरोप त्यांनी केला.