हिंगोली : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच विविध वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अशातच आज देखील संतोष बांगर यांनी फोनवर एका आरटीओ अधिका-याची लाज काढल्याचे पाहायला मिळाले. शाळकरी ऑटोला दंड लावल्याने आमदार बांगर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बांगर यांनी अधिका-याला झापल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येणा-या ऑटोला आरटीओ अधिका-याने मोठ्या प्रमाणात दंड ठोठावला होता. यानंतर हे ऑटोचालक आमदार संतोष बांगर यांच्याकडे गेले. त्यांनी संबंधित आरटीओ अधिका-याची दंड मागितल्याने बांगर यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या आमदार बांगर यांनी आरटीओ अधिर्कायाला फोन करत चक्क त्या अधिका-याची लाज काढली आहे. अशा पद्धतीने दंड ठोकणार असाल तर मी आरटीओ ऑफिस ऑफिसला कुलूप लावून टाकेल असा सज्जड दम आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे. दरम्यान, अशा पद्धतने आमदार आरटीओ अधिका-याला झापताणाचा व्हीडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर प्रकाशझोतात आलेले संतोष बांगर यापूर्वी अनेकवेळा आपली वादग्रस्त विधाने आणि आपल्या भूमिकांमुळे चर्चेत राहीले आहेत. शिंदे गटात सर्वांत शेवटी दाखल झालेले आमदार म्हणजे संतोष बांगर. पण त्यापूर्वी पक्षात बंड झाल्यानंतर आणि एकामोगामाग एक आमदार शिंदे गटात सामील होत असताना संतोष बांगर यांनी जाहीर कार्यक्रमात आपण उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसातच ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर सरकारच्या विश्वासमतासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. त्यावेळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संतोष बांगर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होते. परंतु दुस-या दिवशी एका रात्रीत संतोष बांगर यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि ते शिंदे गटात सामील झाले.

