अमरावती : अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्ष विरोधी कारवाया केल्याने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. सुलभा खोडके उद्या (रविवारी) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
उद्या (रविवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावती दौ-यावर असून उद्याच प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे, त्याआधी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार आणि बाकी आमदार खासदारांनी अजित पवारांना साथ देत शिवसेना आणि भाजप यांच्यासोबत सरकार स्थापन केले. तेव्हापासून काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटासोबत जास्त सलगी वाढल्याच्या चर्चा आहेत. अमरावती मतदारसंघाच्या विविध विकासकामांसाठी निधी, शासन स्तरावर प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी सुलभा खोडके यांनी अजित पवारांची मदत घेतली.
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा, त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत काही काँग्रेस आमदारांवर क्रॉस व्होटिंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामध्ये सुलभा खोडके यांचे देखील नाव असल्याची चर्चा होती, तर काँग्रेसच्या श्रेष्ठींनी ज्या पाच आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा ठपका ठेवला होता त्यांना विधानसभेची उमेदवारी नाहीच, असा निर्णय घेतला. त्यात सुलभा खोडकेंचे नाव होते. त्यामुळे त्यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारादरम्यान त्या कुठे दिसल्या नाहीत. एकंदरीत आमदार खोडके यांनी अजित पवार पक्षाची वाट धरल्याच्या चर्चा सुरू होत्या.