रायगड : प्रतिनिधी
जिल्ह्यात पुन्हा एकदा महायुतीतील घटक पक्ष शिंदेसेना-राष्ट्रवादी यांच्यातील वाद पेटला आहे. शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरेंवर घणाघात करत ते विश्वासघातकी असून मला मारण्याची सुपारी त्यांनी दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो आहोत. सुनील तटकरे ज्याप्रमाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या विरोधात काम करत आहेत. त्याबद्दल तक्रार केली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून अनिकेत तटकरेंना आम्ही मदत केली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही शिंदे साहेबांच्या आदेशाचे पालन केले. मात्र मुलगा आमदार झाल्यानंतर पुन्हा तटकरेंनी माझ्या मतदारसंघात अधिका-यांना धमकावून बैठका लावणे, कामात ढवळाढवळ करणे हे सुरू केले आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच सुनील तटकरे हे विश्वासघातकी नेतृत्व आहे हे आम्ही आतापर्यंत सांगत होतो. आम्ही तटकरेंच्या मुलाला पाठिंबा देऊन फार मोठी चूक केली असं वाटायला लागले आहे. मी आणि महेंद्र दळवी यांनी त्यावेळी निर्णय घेतला असता तर तटकरेंचा मुलगा आमदार झालाच नसता. मात्र आम्ही आदेशाचे पालन केले. सुनील तटकरे केसाने गळा कापणारे आहेत. तटकरे मला मारण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा आमदार महेंद्र थोरवे यांनी केला.
मला संपवण्याचा डाव : थोरवे
दरम्यान, मला संपवण्याचा डाव सुनील तटकरे रचत आहेत. आपापसात वाद लावायचे आणि काय व्हायचे ते होईल असं करत हे पोळी खाणार आहेत. सुनील तटकरे कधीही माझा घात करू शकतात हेदेखील साहेबांना सांगितले आहे. मी राजकारणात अजिबात घाबरत नाही. माझा मृत्यू ज्यादिवशी होणार आहे तेव्हा होईल. पण सुनील तटकरे कुटिल डाव खेळणार असतील तर आम्हीसुद्धा जशाच तसे उत्तर देऊ. जे व्हायचे असेल ते होईल असा इशाराही आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आहे.
















