मुंबई : ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांना मनसे कार्यकर्त्याकडून धमकी देण्यात आली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधातील तक्रारीनंतर कार्यकर्त्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांना धमकी देण्यात आली आहे. गाडी फोडण्याची धमकी सदावर्ते यांना देण्यात आली आहे.
सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर मनसे कार्यकर्त्याकडून गुणरत्न सदावर्ते यांना धमकी देण्यात आली आहे. याची एक ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे. मनसे कार्यकर्त्याने गुणरत्न सदावर्ते यांना फोन केला, त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी विचारले कोण बोलतय? सदावर्ते यांच्या या प्रश्नावर मी राज ठाकरे साहेबांचा महाराष्ट्र सैनिक बोलतोय असे सांगण्यात आले. त्यानंतर तुम्ही राज साहेबांबद्दल चुकीचे स्टेटमेंट कशाला देता? असा सवाल सदावर्ते यांना करण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना सदावर्ते यांनी सांगितले की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे. तीन भाषा शिकवण्याचा अधिकार आहे. मला सांगा जर तीन भाषा शिकण्याचा अधिकार असल्यानंतर आपण लोकांच्या पोरांना खिशातल्या पैशांनी शिकवतो का ओ? त्यानंतर मनसेच्या कार्यकर्याने गुणरत्न सदावर्ते यांना धमकी दिली. तुमच्या घरावर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी तुमची असेल, उद्या जर तुम्ही गाडीमध्ये असाल तर गाडीची काच फोडली जाईल हे लक्षात ठेवा, असे मनसे कार्यकर्याने सदावर्ते यांना म्हटले.
दरम्यान त्यानंतर सदावर्ते देखील चांगलेच आक्रमक झाले. मला हल्ल्याची भीती वाटत नाही, तुम्ही अशा धमक्या मला देऊ नका, राज ठाकरे यांना सुधारायला सांगा असे सदावर्ते यांनी या मनसेच्या कार्यकर्त्याला म्हटले.