तेल अवीव/तेहरान/वॉशिंग्टन डीसी : अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा आज २२ वा दिवस आहे. शनिवारी, पंतप्रधानांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर संवाद साधला आणि त्यांना ईद व नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी ही माहिती सोशल मीडियावर दिली.
पंतप्रधानांनी लिहिले की मी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पाझाश्कियान यांच्याशी बोललो. या सणासुदीच्या काळात मध्य-पूर्वेत शांतता आणि स्थैर्य नांदेल अशी आशा आम्ही व्यक्त केली.
इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणात, मोदींनी मध्य-पूर्वेतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील (जसे की तेल, वीज इत्यादी) हल्ल्यांचा निषेध केला, कारण याचा परिणाम प्रदेशातील शांततेवर आणि जागतिक पुरवठ्यावर होतो. ते म्हणाले की, सुरळीत व्यापारासाठी सागरी मार्ग खुले आणि सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. इराणमध्ये राहणा-या भारतीयांच्या संरक्षणासाठी केलेल्या मदतीबद्दल त्यांनी इराणचे आभारही मानले.
ट्रम्प यांनी नाटो देशांना भित्रे म्हटले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धात साथ न दिल्याबद्दल नाटो सहयोगी देशांवर नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प म्हणाले की नाटो देश भित्रे आहेत आणि अमेरिकेशिवाय ही युती फक्त कागदी वाघ आहे. ट्रम्प यांनी होर्मुज स्ट्रेटचा उल्लेख करत म्हटले की, ते खुले ठेवण्यासाठी लष्करी मदत देणे सोपे आहे, परंतु सहयोगी देश यातही मागे हटत आहेत. ते म्हणाले ही एक खूप सोपी लष्करी कृती आहे, ज्यात खूप कमी धोका आहे, पण त्यांना मदत करायची नाही. ते भित्रे आहेत आणि आम्ही हे लक्षात ठेवू.

