केदारनाथ : उत्तराखंडमधील महत्त्वाकांक्षी केदारनाथ आणि हेमकुंड साहिब रोपवे प्रकल्पांच्या कामाला गती मिळाली आहे. केदारनाथ रोपवेसाठी लिडार सर्वेक्षण, व्हीडीओग्राफी आणि स्थलाकृतिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता भू-तांत्रिक तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे यात्रेकरूंना मोठा दिलासा मिळणार असून केदारनाथचा सुमारे १३ किलोमीटरचा प्रवास अवघ्या ३० ते ४० मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे.
गौरीकुंड आणि सोनप्रयाग येथील स्थानकांच्या बांधकामासाठी आवश्यक भू-तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच सुरक्षित मार्ग निश्चित करण्यासाठी करण्यात आलेले स्थलाकृतिक सर्वेक्षणही पूर्ण झाले असून सोनप्रयाग-गौरीकुंड-केदारनाथ या मार्गाची प्राथमिक आखणी तयार करण्यात आली आहे. अंतिम आराखड्याला जून २०२६ मध्ये मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, हेमकुंड साहिब रोपवे प्रकल्पासाठी भूसर्वेक्षणाचे काम सुरू असून खराब हवामानामुळे काही काळ थांबलेले ड्रोन सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
अंतिम टप्प्यासाठी डीजीपीएस आणि लिडार सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. हेमकुंड साहिब रोपवे पूर्ण झाल्यानंतर सध्या अत्यंत कठीण मानली जाणारी चढाई अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे वृद्ध, दिव्यांग आणि सर्वसामान्य यात्रेकरूंना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. सोमवारी सचिवालयात उत्तराखंड रोपवे डेव्हलपमेंट लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
















