20.7 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रमतदान कार्ड जमा करून दिले पैसे?; दोघांना अटक

मतदान कार्ड जमा करून दिले पैसे?; दोघांना अटक

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून आता छुपा प्रचार सुरू झाल्याचे पहायला मिळते आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरात मतदान कार्ड किंवा आधार कार्ड जमा करून मतदान न करण्यासाठी पैसे दिले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. घडलेल्या प्रकारावरून आता शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार राजू शिंदे आणि विधान परिषदेचे नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

जवाहरनगर परिसरात एक व्यक्ती आधार कार्ड किंवा मतदानकार्ड जमा करत असल्याची माहिती शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार राजू शिंदे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठले. लोकशाही पद्धतीने मतदान करण्यापासून थांबवणा-यांवर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी, अशी त्यांनी मागणी केली. कार्ड जमा करणारे शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोपही त्यांनी केला. आतापर्यंत विशिष्ट समुदायातील पाच हजार कार्ड जमा करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून लोकशाहीच्या मारेक-यांना सोडू नये, अशी त्यांनी मागणी केली.

एका कागदपत्राचे दोनशे रुपये कमिशन
राजू शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, मतदारांना मतदान कार्ड जमा करून मतदान करू नये, यासाठी अगोदर दीड हजार रुपये आणि मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दीड हजार रुपये मिळतील, असे आमिष दिले जात होते. विशिष्ट समुदायातील मतदारांची माहिती आणि कागदपत्रं घेतली जात होती. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीला एका कागदपत्राचे दोनशे रुपये कमिशन मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अंबादास दानवे यांची टीका
या घटनेनंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या एक्सवर पोस्ट करत शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यावर थेट टीका केली आहे. ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगरच्या जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण १८ लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे २ कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR