मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागातून मोसमी वारे अर्थात मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे राज्यातील मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मोसमी वारे हे राज्यामधल्या काही भागांमधून माघारी गेलेले आहेत. मुंबईसह राज्यामधल्या काही भागांमधून मोसमी वारे हे सध्या माघारी फिरत आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत संपूर्ण राज्यामधून मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल असे वातावरण तयार होत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने या संदर्भातली माहिती दिली आहे. शेतक-यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी देखील चिंता निर्माण करणारी ही बातमी आहे. भारतीय हवामान विभागाकडून मोठी घोषणा केली आहे. राज्यातल्या काही भागातून मोसमी वारे माघारी परतले असल्याची घोषणा ही भारतीय हवामान केंद्राकडून करण्यात आलेली आहे आणि सोबतच पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण राज्यातून हे मोसमी वारे माघारी परततील. एकूणच परतीचा पाऊस हा कुठेतरी होईल, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मान्सून दोन दिवसांत १३ राज्यांतून घेणार निरोप
तर भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत १३ राज्यांमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल. दरम्यान, दक्षिणेत काही भागांत जोरदार, तर केरळमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशातील उर्वरित भाग, गुजरात, मध्य प्रदेशातील बहुतांश भाग, संपूर्ण जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सून परतण्याची परिस्थिती आहे.
यंदा १२.६ टक्के कमी पाऊस
जून ते सप्टेंबर या हंगामात देशात दीर्घकालीन सरासरीच्या ८७.४ टक्के पाऊस झाला. सामान्यत: या काळात देशात ८६८.६ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र ७५९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. २००१ नंतरचा हा देशातील चौथा सर्वांत कमी पावसाचा मान्सून हंगाम ठरला आहे. तर १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान देशात पावसाची १२.६ टक्के तूट नोंदवण्यात आली आहे.
















