22.2 C
Latur
Friday, September 13, 2024
Homeमहाराष्ट्रलेकीच्या लग्नात डीजेमुळे आई झाली कर्णबधिर

लेकीच्या लग्नात डीजेमुळे आई झाली कर्णबधिर

सातारा : प्रतिनिधी
गणपती मिरवणुकीत डीजेचा दणदणाट आणि त्यावर थिरकणा-या तरुणाईला पाहणे आता नित्याचे झाले आहे. पण, डीजेतून बाहेर येणा-या ध्वनीलहरी कानावर आदळून कर्णबधिरत्व येत असल्याची धक्कादायक उदाहरणे सातारा आणि सांगली जिल्ह्यांत घडली आहेत.

कोरेगाव तालुक्यातील एका गावात लेकीच्या लग्नात वाजणा-या डीजेमुळे चक्क तिच्या आईला कर्णबधिरत्व आले आहे, तर सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात नागपंचमीच्या मिरवणुकीत तब्बल आठ युवकांनाही कर्णबधिरत्व आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मिरवणूक म्हटले की, ध्वनिक्षेपकाच्या भिंतींवर चढून नाचण्याची झिंग तरुणाई अनुभवते. मात्र, अनेकांना मिरवणुकीत डोके दुखणे, मळमळ, रक्तदाब वाढणे, चक्कर येणे यासह कर्णबधिरत्व होण्याच्या त्रासालाही सामोरे जावे लागते. आवाजाची सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली पातळी हे या त्रासामागचे मुख्य कारण आहे. ध्वनिवर्धकांच्या भिंती उभ्या करून त्याच्यासमोर नाचणारे कार्यकर्तेही मिरवणुकीनंतर कानात दडे बसल्याचेच अनुभवत आहेत.

सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे नागपंचमीचा उत्सव जोरकसपणे साजरा केला जातो. राज्यभरातून नागपंचमीचा उत्सव पाहण्यासाठी भक्तांची गर्दी झालेली असते. यंदा एकाच गावात तब्बल ८० डीजे लावले होते. मद्याच्या धुंदीत असणा-या तरुणाईने तेथे बेफाम नृत्य केले; पण मिरवणूक संपल्यानंतर यातील काही युवांना ‘रिंगिंग इअर’ अर्थात कानात आवाज येण्याचा त्रास जाणवू लागला. यातील काहींनी स्थानिक उपचार घेतले. पण आठ तरुणांना मात्र काहीच ऐकू येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर क-हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या तरुणांचे पडदे शाबूत आहेत; मात्र डीजेच्या ध्वनीलहरींमुळे कानांच्या नसांना त्रास झाला असून ते पूर्णपणे कर्णबधिर झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR