नवी दिल्ली : लोकसभेत आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आभार प्रस्ताव संयुक्त संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्रात पास करण्यात आला. मात्र यंदाचा आभार प्रस्ताव हा ऐतिहासिक ठरला. तब्बल २१ वर्षानंतर पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय हा प्रस्ताव लोकसभेत पास करण्यात आला होता. यापूर्वी २००४ मध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर तत्कालीन पंतप्रधानांना भाषण करता आले नव्हते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणार आभार प्रस्तावावेळी भाषण करणे अपेक्षित होते. मात्र विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत सतत व्यत्यय आणि गोंधळ घातल्याने लोकसभा अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले. यानंतर दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्रावेळी लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव वाचून दाखवला. त्यानंतर आवाजी मतदानाने हा प्रस्ताव पारीत करण्यात आला. मात्र यावेळी देखील विरोधी पक्षाचे सदस्य घोषणाबाजी करत होते. यानंतर प्रदर्शन थांबण्याचे नाव घेत नाही हे पाहून स्पीकर ओम बिर्ला यांनी सभागृह दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले.
२००४ ला काय झाले होते?
२००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भाजपकडून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावेळी भाषण करताना रोखण्यात आले होते. आता २०२६ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण करण्यापासून रोखले आहे.
जुना व्हीडीओ व्हायरल
काँग्रेसचे सचिव जयराम रमेश यांनी याबाबतचा जुना व्हीडीओ एक्सवर पोस्ट केला आहे. यात मनमोहन सिंग हे २००५ मध्ये सभागृहाला संबोधित करत होते. त्यात मनमोहन सिंग हे २००४ मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर भाषण करू देण्यात आले नसल्याचा उल्लेख करत आहेत.

