मुंबई: आयपीएल २०२६ च्या हंगामात दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला मुंबई इंडियन्सचा संघ सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबईला पराभवाचा धक्का सहन करावा लागला असून, आता प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे त्यांचे गणित कमालीचे कठीण झाले आहे. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मुंबई इंडियन्ससाठी सुरुवातीला फायदेशीर ठरला. फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत २० षटकांत ५ गडी राखून २४३ धावांचा हिमालय उभा केला. विजयासाठी २४४ धावांचे मोठे आव्हान असताना मुंबईचे पारडे जड वाटत होते, मात्र हैदराबादच्या फलंदाजांनी वेगळाच मनसुबा रचला होता.
हैदराबादने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्या ६ षटकांत (पॉवरप्ले) एकही विकेट न गमावता ९२ धावा कुटून त्यांनी मुंबईच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास डळमळीत केला. १३३ धावांवर ३ विकेट्स गेल्यानंतर सामना पुन्हा मुंबईच्या बाजूने झुकत असल्याचे वाटले, परंतु हेनरिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी या जोडीने मुंबईच्या हातातून विजय हिसकावून नेला. क्लासेनने अवघ्या २२ चेंडूत झंझावाती अर्धशतक ठोकले आणि हैदराबादला सहज विजय मिळवून दिला.
कर्णधार हार्दिक पांड्या काय म्हणाला?
सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्याने गोलंदाजीतील त्रुटींवर बोट ठेवले. तो म्हणाला, “मैदानावर दवबिंदूचा (Dew) कोणताही परिणाम झाला असे मला वाटत नाही. हैदराबादच्या फलंदाजांनी काही चांगले फटके मारले, तर आम्ही खराब चेंडू टाकले. २४४ धावांचे रक्षण करण्यासाठी मी माझ्या गोलंदाजांना पूर्ण पाठिंबा देईन, परंतु मैदानावर आम्ही आखलेली रणनीती प्रत्यक्षात उतरवू शकलो नाही.”
चाहत्यांच्या प्रतिसादाबद्दल बोलताना हार्दिक भावूक झाला. तो म्हणाला, “आमचे चाहते अत्यंत निष्ठावान आहेत, पण दुर्दैवाने आम्ही त्यांना जल्लोषाची जास्त संधी दिली नाही. जेव्हा घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाच्या नावाचा जयघोष होतो, तेव्हा वाईट वाटते. आता उर्वरित सामन्यांत आम्हाला अधिक चांगल्या कामगिरीची गरज आहे.”
प्लेऑफचे समीकरण
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या आठ पैकी सहा सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आता त्यांच्याकडे फक्त सहा सामने शिल्लक आहेत. जर मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर त्यांना उर्वरित सहाच्या सहा सामन्यांत विजय मिळवणे अनिवार्य आहे. मुंबईचा संघ त्यांच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो, त्यामुळे ते पुन्हा एकदा बाजी मारणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

