मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली असून मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला आहे. ७ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्विकारले जाणार आहेत. तर ११ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची घोषणा केली जाणार आहे. ११ फेब्रुवारी रोजीच दुपारी १२ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. महापौरपादासाठी अर्ज मागे घेण्याची वेळ सभागृह भरण्याच्या १५ मिनिटे आधी असणार आहे.
राज्यात नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या महापालिकांच्या महापौर पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. मुंबई, ठाणे, पुणे अशा लक्षवेधी महापालिकांसह सर्व २९ महापालिकांच्या महापौर पदासाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. मुंबई महापालिकेचे महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे, तर ठाण्यात अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २०२६ च्या अंतिम निकालाने मुंबईच्या राजकारणात मोठे बदल स्पष्ट केले आहेत. २२७ सदस्यीय महापालिकेत भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकून पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे.
शिंदे गटाच्या शिवसेनेला २९, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ६५, काँग्रेसला २४, मनसेला ६, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ३, राष्ट्रवादी शरद पवार गटाला १, समाजवादी पक्षाला २ तर एमआयएमला ७ जागा मिळाल्या आहेत. या निकालात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मुंबई महापालिकेत अमराठी नगरसेवकांचा वाढता प्रभाव. यंदा २२७ पैकी मोठ्या संख्येने अमराठी नगरसेवक सभागृहात पोहोचले असून राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.

