पुणे : मुंढवा भूखंड व्यवहार २०२१ पासूनच पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या नियंत्रणात होता. पण हे प्रकरण अंगाशी आल्यानंतर त्याची जबाबदारी माझ्यासारख्या मध्यस्थावर ढकलण्यात आली, असा दावा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शीतल तेजवानीने केल्याचा दावा आहे.
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर मुंढवा येथील १८०० कोटींची महार वतनाची जमीन अवघ्या ३०० कोटींत खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपांची राळ उठल्यानंतर हा सौदा रद्दबातल करण्यात आला. नंतर या प्रकरणी शीतल तेजवानी यांच्यासह अन्य एका कथित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर विजय कुंभार यांनी शीतल तेजवानीचा दाखला देत या प्रकरणाचा सर्व व्यवहार २०२१ पासूनच पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली होता असा दावा केला आहे.
प्रकरण अंगाशी आल्यानंतर माझ्यावर
जबाबदारी लोटली : शीतल तेजवानी
माझ्याविरुद्धचे प्रकरण म्हणजे अंगाशी आल्यानंतर आखलेला सुटकेचा डाव आहे. ती म्हणते, २०२१ पासून हा व्यवहार अमेडीयाच्या नियंत्रणात होता. २०२१ ची पॉवर ऑफ अटर्नी सर्व पक्षांना पूर्ण माहिती असताना करण्यात आली. प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे जाणीवपूर्वक दडवण्यात आली आहेत. माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर दस्त रद्द दावा दाखल करण्यात आला. व्यवहार धोकादायक ठरल्यानंतर जबाबदारी माझ्यासारख्या मध्यस्थावर ढकलण्याचा प्रयत्न होतोय. २०२१ च्या पीवोए पासूनच पार्थ पवार यांना वस्तुस्थिती माहिती होती.

