नांदेड : प्रतिनिधी
विष्णुपुरी परिसरातील एका बंद खोलीत तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मुख्य आरोपीला अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सनी अजेबसिंग मसीह रा. ईसानगर, बटाला, जि. गुरुदासपूर, पंजाब; सध्या रा. विष्णुपुरी आणि आरोपी दारासिंग गुरुनामसिंग हे विष्णुपुरी परिसरातील एका खोलीत भाड्याने राहत होते.
आरोपीने सनीकडून घेतलेली बंदूक परत न केल्याच्या वादातून दोघांमध्ये वाद झाला. दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता झालेल्या वादातून आरोपीने सनीच्या डोक्यावर व तोंडावर दगडाने गंभीर वार केल्याचे पोलिस तपासात समोर आले. या हल्ल्यात सनीचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मृतदेह खोलीत लपवून ठेवून बाहेरून कुलूप लावले आणि घटनास्थळावरून पसार झाला.
दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी संबंधित बंद खोलीतून दुगंर्धी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिसांचे अधिकारी व गुन्हे शोध पथकाने पंचांसमक्ष बंद खोलीचे कुलूप तोडून पोलिसांनी सडलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी फिर्यार्दी सुरज शास्त्री यांच्या जबाबावरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, सुनील भिसे, बाबुराव चव्हाण तसेच गुन्हे शोध पथकातील माधव मारवाडे, लक्ष्मण जाधव, माळगे, शेख, कांबळे, विठ्ठल भिसे, कल्याणकर, पवार, शेख गफार, जीवन तेलंग, भगवान, टिपरसे, संतोष जाधव, बुंगई, कवडे आणि सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध
खून केल्यानंतर आरोपी पसार होण्याच्या तयारीत असल्याने पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. आरोपी हा मूळचा पंजाब राज्यातील असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. नांदेड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अवघ्या काही तासांत आरोपी दारासिंग गुरुनामसिंग वय ५१ याचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून घटनेबाबत अधिक माहिती घेण्यात येत असून, खुनामागील नेमका घटनाक्रम आणि इतर बाबींचा पुढील तपास सुरू आहे.
















