पुणे : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू येथील मुरूम प्रकरणात अजितदादांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कुर्डू मुरूम उत्खनन प्रकरणाचा अहवाल माढा तहसीलदारांनी सोलापूर जिल्हाधिका-यांकडे पाठवला. त्यामुळे अजितदादांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कारवाईपासून रोखण्यासाठी केलेल्या कॉलमुळे अजित पवार वादात सापडले होते. त्यांच्याविरोधात टीकेची झोड उठली होती. तर त्यांच्या बचावासाठी विरोधी बाकावरील आमदार रोहित पवार समोर आल्याचे दिसून आले होते. आता या अहवालाने पुन्हा वादाला तोंड फोडले आहे.
कुर्डूतील मुरूम उत्खनन हे बेकायदेशीरच असल्याचा ठपका माढाच्या तहसीलदाराने पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे. कुर्डू येथील गट क्रमांक ५७५-१ मध्ये १२० ब्रासचा मुरूम अवैधरित्या उत्खन्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तहसीलदारांनी सोलापूर जिल्हाधिका-यांना हा अहवाल पाठवला आहे. दादाराव माने यांच्या शेतातून हा मुरूम उत्खनन करण्यात आला आहे. उत्खनन केलेला मुरूम हा शिराळ कुर्डू अंबड येथील पाणंद रस्त्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणात २०२४ साली आदेश देण्यात आले होते. पण त्याला मुदतवाढ देण्यात आली नव्हती. मुरूम उत्खनन गटातून बेकायदेशीररित्या हा मुरूम उत्खनन केल्याचे गटविकास अधिका-यांनी तहसीलदारांना पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे.
अहवाल प्राप्त झाला
कुर्डू मुरूम उपसा प्रकरणाच्या अहवालावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली. कुर्डूमध्ये झालेला मुरूम उपसा हा बेकायदेशीर होता त्याबाबतचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. त्या ठिकाणी जी काम मंजूर झाली होती त्याची मुदत संपलेली होती तसेच उत्खनन करण्यासाठी कोणतेही परवानगी घेतलेली नव्हती. या प्रकरणामध्ये काही लोकांचा सहभाग आहे त्यामुळे ग्रामस्थांनी गावाला वेठीस धरू नये जी वस्तुस्थिती आहे ती समोर आलीय. ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. समन्वयाने पुढे गेले पाहिजे. गाव बंद ठेवून प्रश्न सुटणार नाहीत, असे गोरे म्हणाले. दरम्यान आज गावक-यांना बंद पुकारण्याचा निर्णय जाहीर केला होता.
















