नागपूर : दिल्लीतील आंदोलकांवर टीका करणारे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्राला प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर केलेले आंदोलन नौटंकी असल्याची टीका आपण राजकीय नेत्यांवर केली होती. विद्यार्थ्यांचे आंदोलन लोकशाही मार्गाने होत असून त्यावर त्यांनी कधीही टीका केलेली नाही असा दावा बावनकुळे यांनी केला. शुक्रवारी नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आंदोलन करण्याचा विद्यार्थ्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र या आंदोलनाच्या आडून काही राजकारणी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असून राहुल गांधी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि निवासस्थानाबाहेर केलेले आंदोलन ही एक प्रकारची नौटंकी होती. विद्यार्थी आंदोलकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून आंदोलकांनी सरकारवर विश्वास व्यक्त केला असून आपण पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली, असे बावनकुळे यांनी सांगितले. मुंबईतील आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांशी गैरवर्तन व विनयभंग झाल्याच्या आरोपांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित पोलिस अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दोषी आढळणा-यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
















