26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeनांदेडअवलिया मित्राची एक्झिट

अवलिया मित्राची एक्झिट

एकमत ऑनलाईन

जगावेगळा हे विशेषण आपण सर्रास वापरत असलो तरी काही मोजकीच माणसं जगावेगळी असतात. त्यांच्यातलं हे वेगळेपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रमुख अंग असतं. अनिलच्या बाबतीत तेच होतं. मनात येईल त्या गोष्टीत मग्न होऊन जाणं हा त्याचा स्वभावपिंड होता. जबाबदा-या त्याला गद्य वाटायच्या. साधी राहणंी हे त्याचं जीवनसूत्र होतं. कारण अत्यंत निरपेक्ष मनानं तो आयुष्य जगला. किंबहुना त्याची ती फिलॉसॉफीच बनली की, माणसानं स्वच्छंदी जगावं. प्रत्येक क्षण जिवंत जगायचा असं त्याचं तत्त्वज्ञान होतं. कुतुहल हा अनिलचा सर्वांत मोठा प्लस पॉईंट होता. यातूनच त्याच्या लेखनकलेला बहर येण्यास वाव मिळाला. त्याची लेखनशैली सोपी, सुटसुटीत असली तरी अंतर्मुख करायला लावणारी होती. जगण्यातील गुंतागुंत दर्शवणारी होती.

डॉ. अनिल अवचट हा माझा गेल्या ५० वर्षांपासूनचा मित्र. आम्हा दोघांचेही वडील डॉक्टर. अनिल माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. १९६२ मध्ये आम्ही बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून अनिल अवचट आणि कुमार सप्तर्षी ही जोडी लोकांच्या मनात ठसली. आमचं स्वतंत्र नाव घेतलंच जायचं नाही इतकी ही मैत्रीची वीण घट्ट होती. त्यावेळी सायकल हेच मुख्य वाहन असायचं. स्कूटर अजून बाजारात आली नव्हती. त्यामुळं सायकलवर बसून तो मला सोडायला यायचा, मी त्याला सोडायला जायचो असा तो काळ. अनिलची पत्नी सुनंदा हीदेखील माझी वर्गमैत्रीण. आम्हा सर्वांचा त्यावेळी एक ग्रुपच होता. आम्ही तिथूनच एमबीबीएस झालो. पुढं युवक क्रांती दलाच्या स्थापनेमध्येही आम्ही साथीदार होतो. युक्रांदचा कलात्मक भाग अनिलचा होता; तर वैचारिक भाग माझा होता. १९७२ पर्यंत अनिल युक्रांदमध्ये सक्रिय होता. त्यानंतर त्यानं मला एकदा सांगितलं की, मला युक्रांदचे नैतिक परिणाम, विचारधारा आदी सर्व गोष्टी मान्य आहेत; पण त्यातून निर्माण होणारी जी जबाबदारी आहे, संघटना, माणसं…यामध्ये माझं मन रमत नाहीये. यावर मीही ठीक आहे म्हणून त्याला मुक्त केलं. युक्रांदमधून बाजूला झाला असला तरी आमच्यात अंतर कधीच आलं नाही. ‘युुक्रांद’च्या चळवळीची पार्श्वभूमी त्याला सामाजिक विषयांवर लेखन करण्यासाठी उपयोगी पडली.

युक्रांदची स्थापना होण्यापूर्वी आम्ही साप्ताहिक दवाखाने चालवायचो. त्यासाठी सुनंदा आणि अनिल यांना नांदेडसारख्या भागात आम्ही पाठवायचो. त्यातूनच त्यांच्यातलं प्रेम जुळलं आणि पुढं ते एकमेकांचे जीवनसाथी बनले. अनिलच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, त्याला जबाबदारी फार गद्य वाटायची. त्या-त्या क्षणाला ज्यामध्ये मग्न व्हावंसं वाटतंय त्यात समरसून जायचं हा त्याचा स्वभावपिंड होता. ही बाब उमगल्यानंतर त्याला आम्ही सांगितलं की, तुला जे आवडतं ते तू कर. विशेषत: यामध्ये सुनंदाचा वाटा फार मोठा होता. तिनं त्याला सांगितलं की तुला ज्यामध्ये मग्न व्हायचं आहे त्यात तू मग्न राहा. बाकी आर्थिक, कौटुंबिक जबाबदा-या मी सांभाळते. मग त्यानं शिल्पकला, चित्रकला, ओरीगामी या आधीपासूनच त्याच्यात असणा-या कलांना नवं आकाश दिलं आणि त्या बहरत गेल्या.

चौकटी फोडून आकाशात उडणारा पक्षी हा युवक क्रांती दलाचा सिम्बॉल अनिलनंच तयार केलेला आहे. आजही आमच्या पत्रकांवर तो आम्ही वापरतो. अनिलचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही गोष्ट मग्न होऊन, मनापासून ओतून देऊन करायची. त्यामुळंच त्याच्या लेखणीलाही तेज होतं. यदुनाथ थत्ते ‘साधना’चे संपादक असताना त्यांनी आम्हाला युक्रांदतर्फे एक सदर चालवा असं सांगितलं होतं. ‘वेध’ नावाचं हे सदर अनिलच चालवायचा. यातून आमच्या विचारांचा प्रसारही होत असे. १९६८ ते १९६९ अशी वर्षभर ही लेखमाला चालली. भवताली दिसणा-या छोट्या छोट्या विषयांवर तो लिहायचा. त्याचं लिखाण दुर्बोध नव्हतं. सोप्या शैलीत लिहायचा; पण थेट काळजाला हात घालणारी शैली हे त्यातलं वेगळेपण होतं. मला आठवतंय ‘वेध’ मधला पहिला लेख ‘स्वच्छ पुणे की सुंदर पुणे’ हा होता. त्यावरून बरीच चर्चाही झाली होती. पुढं जाऊन अनिल ‘साधना’चा संपादकही बनला. पण राजा ढाले यांचा एक लेख ‘साधना’मध्ये प्रकाशित झाला आणि त्यातील काही मुद्यांवरून वादंग निर्माण झालं. साधनेवर मोर्चे काढले गेले. या सर्वांमुळे तो या परिघाबाहेर गेला. पण या प्रसंगामुळे त्याच्या लक्षात आलं की माणसांचा खेळ फार अवघड आहे. म्हणून आपल्याला जे वाटतं ते करायचं. किंबहुना त्याची ती फिलॉसॉफीच बनली की, माणसानं स्वच्छंदी जगावं. प्रत्येक क्षण जिवंत जगायचा असं त्याचं तत्त्वज्ञान होतं.

एकदा मी त्याला विचारलं की, तुझ्या नेतृत्वाखाली मी जर एखादा सत्याग्रह सुरू केला आणि त्याच दिवशी जर भीमसेन जोशींचा गाण्याचा कार्यक्रम असेल तर तू काय करशील? तो पटकन म्हणाला, मी गाणं ऐकायला जाईन! साहजिकच संघटनेमध्ये असं चालत नाही. म्हणून मग आम्ही आनंदानं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण आमची मनं सदैव जोडलेलीच राहिली. मध्यंतरी माझ्या मुलाचं लग्न झालं. त्यासाठी त्याला निमंत्रण दिलं होतं; पण तो आला नाही. दुस-या दिवशी आला आणि माझ्या सूनबाईंना बासरी वाजवून दाखवली, चित्रं काढून दाखवली. असं त्याचं आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व होतं आणि मी ते स्वीकारलं होतं. त्यानंही माझं व्यक्तिमत्त्व स्वीकारलेलं होतं. माझं चित्र तो रोमन सैनिक म्हणून काढायचा.

आणखी एक प्रसंग मला सांगावासा वाटतो, ज्याचा अनिलच्या लेखनावर दूरगामी परिणाम झाला. एस. एम. जोशींनी मला एकदा विचारलं की, बिहारमधील अत्यंत मागासलेला असलेल्या पूर्णिया जिल्ह्यामध्ये भूमीमुक्ती आंदोलनासाठी जायचं आहे, कुणाला पाठवशील? त्यावेळी मी अनिलला जायला सांगितलं. तिथल्या विदारक, दाहक वास्तवानं तो हादरून गेला. पुण्याला परतल्यानंतर त्यानं ब-याच दिवसांनी तिथले अनुभव लिहायला घेतले. ‘माणूस’मध्ये ते छापून आले. त्यावरून ‘पूर्णिया’ हे त्याचं पहिलं पुस्तक आकाराला आलं. सोपी भाषा, सुटसुटीत वाक्यं, फोटोग्राफिक मेमरीनं ते अनिलनं लिहिलं. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळीत त्यानं सहभाग घेतला होता. हमाल पंचायतीच्या कामात सहभागी झाल्यानंतर त्यानं हमालांवर एक फार सुंदर लेख लिहिला. तो वाचून हमाल त्यांचे प्रश्न घेऊन अनिलला भेटायला गेले. तेव्हा त्यानं सांगितलं की, मी आता तिखट कांडप करणा-या महिलांच्या क्लेशाबद्दल लिहितो आहे. असा हा अवलिया. त्याच्या नशिबानं त्याला त्या-त्या क्षणी जे वाटतं ते करायला मिळालं! भवतालच्या आर्थिक, भौतिक जबाबदा-या कुणी ना कुणी पहात गेलं! यामुळं त्याला आपलं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आकारता आलं आणि वेगवेगळ्या कलांमधून ते फुलत गेलं. या सर्वाचा केंद्रबिंदू म्हणजे त्याचं साधं राहणं. त्याच्या अपेक्षा काहीच नसायच्या. सच्चा निरपेक्ष म्हणून त्याची ओळख होती.

कुतुहल हा अनिलचा सर्वांत मोठा प्लस पॉईंट होता. यातूनच त्याच्या लेखनकलेला बहर येण्यास वाव मिळाला. पूर्णिया, माणसं, कोंडमारा, धागे आडवे उभे, प्रश्न आणि प्रश्न, संभ्रम, धार्मिक अशी जवळपास ३८ पुस्तकं अनिलनं लिहिली. लेखनातून तो सर्वांचा लाडका झाला. कारण ही सर्वच पुस्तकं नुसती वाचनीय नव्हती तर अंतर्मुख करायला लावणारी होती. जगण्यातील गुंतागुंत दर्शवणारी होती. साधारण महिन्याभरापूर्वी अनिलचं आणि माझं बोलणं झालं होतं. फोनवर तो म्हणाला होता, ‘‘अरे आपण आता अशा टप्प्यावर आहोत की कधीही निरोप घ्यावा लागू शकतो. तेव्हा आपण भेटलं पाहिजे.’’ मीही तात्काळ सांगितलं की, अरे नक्कीच ! पण मला तुझ्याकडचे जिने चढता येत नाहीत.’ यावर तो म्हणाला, ‘अरे मग मी येतो’. पण ती भेट झालीच नाही.

-डॉ. कुमार सप्तर्षी,
ज्येष्ठ विचारवंत

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या