17.6 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeनांदेडकोरोनाच्या ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’मुळे संसर्गाचा धोका!

कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’मुळे संसर्गाचा धोका!

एकमत ऑनलाईन

नांदेड: विशेष प्रतिनिधी
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका वाढला असून प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत जिल्हा प्रशासनासह महापालिका अध्यापही सुस्त अवस्थेत असल्याचे पहावयास मिळत आहे. यासंदर्भात कुठलीही पावले न उचलता केवळ सोशल मिडियामार्फत सूचना देण्यात येत आहेत. जिल्ह्यात नगरपालिकासह महापालिकेची पोटनिवडणूक होत असल्यामुळे दोन्ही प्रशासन या निवडणुक कामात व्यस्त झाले आहेत. त्यामुळे या महामारीवर अंकुश कोणाचा राहणार असा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीव्दारे बैठक घेतली परंतु या बैठकीनंतर कागदी घोडे जिल्हा प्रशासन व महापालिका नाचवत असल्याचे पहावयास मिळत आहे. जनतेला निर्धाराने नियम पाळावे लागतील असे मुख्यमंत्री सांगत असतांनाही नांदेडात यासंदर्भात कुठल्याच हालचाली पहावयास मिळत नाहीत.
नव्या विषाणुची घातकता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने केंद्राच्या सूचनेची वाट न पाहता आवश्यक निर्णय घेत खबरदारीची पावले उचलावित असे आदेश दिले असतांनाही नांदेडात मात्र सर्वत्र अलबेल कारभार पहावयास मिळत आहे. मास्क न लावता नागरिक बिनदिक्कतपणे बाजारात वावरत आहेत. अनेकांनी तर अध्यापपर्यंत कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्या नसल्याचे उघड होते आहे.

जिल्ह्यात केवळ ६५ टक्के लसीकरण झाले असून मनपा हद्दीत नगन्य लसीकरण झाल्यामुळे लसीकरणात नांदेड जिल्हा खालून तिस-या क्रमांकावर असल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात ३७ लाख ३४ हजार ८0३ लोकसंख्येपैकी केवळ २७ लाख ४४ हजार ३00 नागरिक लसीकरणासाठी पात्र ठरले आहेत. आजघडीला जिल्ह्यात पहिली लस घेणारे १६ लाख ९३ हजार ६९४ नागरिक आहेत. जिल्ह्यात एकूण ६१.७२ टक्के हे प्रमाण आहे तर दुसरा डोस घेण्याचे प्रमाण केवळ २४ टक्के आहे. ६ लाख ६१ हजार ७६८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यामध्ये नांदेड महापालिका हद्दीत लसीकरणाचे प्रमाण केवळ ३0 टक्के झाले आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतांनाही जिल्हा प्रशासनासह मनपा निद्रावस्थेत आहे की काय असा प्रश्न निर्माण होत
आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या