नांदेड: प्रतिनिधी
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दोन अज्ञात मारेक-यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेला आठ दिवस उलटूनही मारेक-यांचा शोध लागला नाही. मात्र बियाणी यांच्या घरी एक निवावी पत्र आले असून त्यात खुनाचा कट हा परभणीत रचला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. या पत्रामुळे खळबळ उडाली असून पोलिस या अनुषंगाने पडताळणी करीत आहेत.
नांदेड शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. मागच्या काही दिवसांपासून शहरात लूटमार, खंडणी, जबरी चोरी, मारहाण, घरफोडी, खून अशा घटनांमुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. त्यात मागच्या आठ दिवसांपूर्वी नांदेड येथी¸fल प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळया घालून दोन मारेक-यांनी भरदिवसा हत्त्या केली. मारेकरी बियाणी यांचा पाठलाग करत घरापर्यंत आले आणि बियाणी गाडीच्या खाली उतरताच त्यांच्यावर अत्यंत जवळून गोळ्या झाडल्या. त्यानंतर मारेकरी दुचाकीवरून काही क्षणात फरार झाले. ज्यांचा पोलिस अद्याप शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले असून बियाणी यांच्या घरी खुनाच्या माहितीसंदर्भात दि.१२ रोजी एक निनावी पत्र आले ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सदर पत्र हे हिंदी भाषेत लिहिले असून, बियाणी साब को ठोकनेका मनसुबा परभणी में हुवा, आनंदनगर में रहनेवाला बडा दादा पांडुरंग येवले परभणीमें आया था जिसने गोरठेकर के बच्चेको मारा था, जो कि रेतीमाफिया है. या प्रकरणात कोणीही येऊ नये, असेही सांगितले आहे. यासोबतच इतर मजकूर लिहून काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसत आहे. तारखेच्या ठिकाणी अस्पष्ट पद्धतीने तारीख लिहिली गेली आहे. हत्त्येबाबत माहिती देण्याचा आशय असणारे हे निनावी पत्र संजय बियाणी यांच्या घरी धडकले. हत्त्येनंतर भयभीत असणारे बियाणी कुटुंबीय या पत्रामुळे आणखी अस्वस्थ झाले आहेत. सध्या नांदेड पोलिसांचा बियाणी यांच्या निवासस्थानी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या पत्राद्वारे संजय बियाणी यांच्या हत्येबाबत काही माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, की पोलिसांच्या तपासाची दिशा भरकटवण्यासाठी कुणी जाणीवपूर्वक हे पत्र पाठवले आहे, याबाबत पोलीस पडताळणी करीत आहेत. हत्येच्या घटनेला आठ दिवसाचा कालावधी होत आहे मात्र अजूनही पोलिसांना आरोपीचे धागेदोरे सापडले नाहीत. त्यात आता या निनावी पत्राने चिंता वाढविली आहे.