27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडजिल्हापरिषद निवडणुकीसाठी अनेकांच्या घुडघ्याला बाशिंग

जिल्हापरिषद निवडणुकीसाठी अनेकांच्या घुडघ्याला बाशिंग

एकमत ऑनलाईन

जिल्हा परिषद हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विकासाचे केंद्रंबिदू आहे. म्हणून त्याला मिनी मंत्रालय म्हटले जाते. तर या सभागृहात निवडून गेलेला सदस्य म्हणजे मिनी आमदार मानला जातो. या मिनी मंत्रालयात मिनी आमदार म्हणून निवडून जाण्यासाठी अनेक इच्छुकांची धडपड सुरू झाली आहे. यासाठी काही इच्छुक पक्षाच्या शोधात आहेत. तर काही राजकीय पक्ष वजनदार उमेदवारांच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील लग्न समारंभात मात्र अनेक नवनवीन नेत्यांची मांदियाळी पहायला मिळत आहे.

अर्धापूर तालुक्यात मालेगाव, येळेगाव आणि लहान अशी तीन जिल्हा परिषद गट तयार झाले आहेत. या तीनही गटात अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. यातील प्रत्येकालाच मिनी मंत्रालयात जाण्याची ओढ लागली आहे. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. काही इच्छुक उमेदवार राजकीय पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची चापलूशी करीत कार्यकर्त्यांमार्फत फिल्डिंग सुरू आहे. तर काही इच्छुक उमेदवार पक्षाची उमेदवारी मलाच मिळणार आहे म्हणून प्रचाराला लागले आहेत.

तसेच काही नवखे उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवायची म्हणजे लढवायचीच असा निर्धार करून राजकीय पक्षाच्या शोधात आहेत. तथापि काही राजकीय पक्ष आपला उमेदवार विजयी झालाच पाहिजे, या दृष्टीने राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रिय असा वजनदार उमेदवार शोधताना दिसत आहेत.
अजून तरी निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली नसली तरी येत्या एक – दोन महिन्यात या निवडणुका होणार आहेत. अशा तयारीने विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

लहान जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाचे संजय देशमुख लहानकर, डॉ. उत्तमराव इंगळे, आनंदराव भंडारे, विजय पाटील भुस्से, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील चव्हाण, अशोक सावंत, चंद्रमूनी (बाळासाहेब ) लोणे, संजय लोणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद सोळके आदी संभाव्य उमेदवार असू शकतात. तर भारतीय जनता पार्टीचे माजी सरपंच अशोकराव बुटले, माजी सभापती बाबुराव हेंद्रे, माजी चेअरमन अवधुतराव पाटील कदम पांगरीकर, सौ. सोनाली नागोराव भांगे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव भालेराव यांच्या पैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

तसेच शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर, दत्ता पाटील पांगरीकर, माजी सभापती दिलीपराव हापगुंडे याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, प्रहार जनशक्ती अशा विविध पक्ष आणि आघाड्यांच्या वतीने अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. तसेच येळेगाव जि. प. गटात शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, माजी तालुका प्रमुख संतोष कल्याणकर, संतोष पाटील कदम बामणीकर, दाभडचे उपसरपंच अरविंद पांचाळ, बालाजी कल्याणकार यांची नावे चर्चेत असली तरी आयत्या वेळी शिवसेना कोणती खेळी खेळणार हे सांगता येत नाही. तर काँग्रेसकडून भगवान पाटील तिडके, माजी संचालक आनंदराव कपाटे, ऍड. सुभाषराव कल्याणकर, गोंविद महाराज गोदरे, खैरगावचे उपसरपंच संजय गोवंदे, भाजपकडून अमोल कपाटे, गजानन मुसळे, संभाजी जाधव किंवा ऐनवेळी एखादा नवखा उमेदवार येऊ शकतो.

त्याशिवाय वंचित बहुजन आघाडी कडून दिनेश लोणे, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, प्रहार जनशक्ती इत्यादी पक्षाकडून उमेदवारी दाखल होणार आहे. तर मालेगाव गटात मात्र काँग्रेसकडे दिग्गज नेते असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव इंगोले, माजी सभापती भुजंगराव साखरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बी. आर. कदम, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, माजी सभापती मंगलाबाई स्वामी, माजी उपसभापती सुनिल अटकोरे, केशवराव पाटील इंगोले आदी मान्यवरांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांला काँग्रेस उमेदवारी मिळणार असली तरी माजी सरपंच राम कदम, कामाजी पाटील कल्याणकार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष भगवान पाटील कदम हे प्रबळ इच्छुक असून सर्व ताकदीनिशी निवडणूक आखाड्यात उतरणार असल्याचे कळते.

त्याशिवाय भाजपचे जिल्हा सचिव डॉ. लक्ष्मण इंगोले, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील कदम, सचिन कल्याणकर, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, डॉ. बालासाहेब बंडेवार तर शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य नागोराव इंगोले, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, कपील पाटील कदम आदी इच्छुक उमेदवार निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. तालुक्यातील सर्वच पक्षांचे छोटे-मोठे कार्यकर्ते व काही अपक्ष उमेदवार आपला चेहरा जनतेला दाखविण्यासाठी ग्रामीण भागातील लग्न समारंभात उपस्थिती नोंदवत असल्यामूळे प्रत्येक लग्न समारंभात इच्छूक उमेदवारांची मांदियाळी दिसून येत आहे.

 

रामराव भालेराव

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या