नांदेड: प्रतिनीधी
सातत्याने शाळा सुरू करण्याची मागणी होत असल्याने अखेर जिल्ह्यातील ९ वी ते १२ पर्यंतच्या सर्व शाळा सोमवार पासून नियमित सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी महापालिका व जिल्हा परिषदेला दिल्या आहेत.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि.१० जानेवारीपासून राज्यातील शाळा १५ फेब्रुवारी पर्यंत शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र याला पालकांनी विरोध दर्शवत शाळा पूर्ववत चालू करण्याची मागणी सातत्याने पाठपुरावा करून लावून धरली होती.
सोमवार २४ जानेवारीपासून जिल्ह्यातील १ ली ते १२ पर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्याची मागणी होत होती.त्यामुळे स्थानिक पातळीवर विचार करून महापालिका क्षेत्रात मनपा आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद याना शाळा सुरू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड१९ ची परिस्थिती पाहता १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण चालू असल्याने दि.२४ जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या इयत्ता ९ वी ते १२ वी च्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना तसेच शासनाने वेळोवेळी संदर्भादिन परिपत्रकांवय दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मनपा व जिल्हा परिषदेने शाळा सुरू करणायच्या आहेत. तसेच या दरम्यान १५ ते १८ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करून घ्यावे आशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत.