नांदेड: प्रतिनिधी
राज्यावर सध्या धुळीचे वादळ घोंगावत असून, राज्यातील पुणे, मुंबई पाठोपाठ याचा परिणाम नांदेड जिल्ह्यातही दिसून येत आहे.अचानक वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मागच्या दोन दिवसांपासून सकाळच्या वेळी दृश्यमानता कमी होऊन उशिरा पांढ-या स्वरूपाचे सूर्याचे दर्शन होत आहे. हा धुळीच्या वादळाचा परिणाम असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
पाकिस्तानच्या दिशेतून येणारे धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्र मार्गे रविवारी राज्यात पोहचले. मुंबई, धुळे, पुणे, जळगाव या जिल्ह्यात धुळीच्या वादळाची तीव्रता अधिक आहे.
त्यामुळे या जिल्ह्यात अचानक तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून आले. तर या पाठोपाठ मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यातही या वादळाचा परिणाम जाणवत असून, सोमवारी सकाळी वातावरणात दृश्यमानता कमी होऊन सूर्यदर्शन जरा उशिरा व पांढ-या रंगाचे झाले. तर तापमानही कमालीचे घसरले असून, दिवसभर वातावरणात गारवा निर्माण होऊन, हुडहुडी भरणारी थंडी कायम होती. दरम्यान धुळीच्या वादळाचा परिणाम आणखी दोन ते चार दिवस राहणार असून, यात दम्याच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना जास्त त्रास जानवण्याची शक्यता आहे. तसेच वातावरणात अचानक गारवा वाढल्याने सर्दी, खोकला, अंगदुखी सारख्या आहारात वाढ होणार आहे. सध्या नांदेड शहरासह परीसरात मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तापमानातील घट आणि वा-यांच्या प्रवाहामुळे वातावरणात दिवसा गारठा निर्माण होत आहे. तसेच धुळीच्या वादळाच्या प्रभावामुळे हवेतील धुली कानामध्ये वाढ झाली आहे. यामुळे सकाळी सकाळी धुक्या प्रमाणे धुळीची चादर पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांनी आणखी दोन ते चार दिवस आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.