नांदेड : प्रतिनिधी
एस.टी. महामंडळाच्या कर्मचा-यांनी विविध मागण्यासाठी २८ ऑक्टोंबर २०२१ पासून संप पुकारला होता. सदर प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत सर्व कर्मचा-यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. १५ एप्रिलपर्यंत नांदेड विभागातून जवळपास १ हजार ५०० कर्मचारी कामावर रुजू झाले असून २५० बस सुरु झाले आहेत अशी माहिती विभागीय नियंत्रक वाळवे यांनी दिली आहे.
राज्यातील एस.टी. कर्मचा-यांनी आपल्या विविध मागण्यासाठी २८ ऑक्टोबर २०२१ पासून बेमुदत संप पुकारला होता. राज्य शासनाने मध्यस्थी करुन कांही मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र कर्मचा-यांनी शासकीय सेवेमध्ये विलीनीकरण करुन घेण्याची मागणीला जोर लावून संप सुरुच ठेवला होता याप्रकरणी न्यायालयात सरकारने धाव घेतली. एस.टी.महामंडळाचे कर्मचारी न्यायालयात दाद मागण्यासाठी अॅडग़ुणवंत सदावर्ते यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयानी हस्तक्षेप करुन २२ एप्रिल २०२२ पर्यंत सर्व कर्मचा-यांनी कामावर रुजू व्हावे जेणे करुन त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
या आदेशाचे पालन करत नांदेड विभागातून दररोज ७० ते ८० कर्मचारी कामावर हजर होत आहेत. अत्तापर्यंत जवळपास २५० बस विविध आगारातून सुरु करण्यात आल्या असून अनखी कांही दिवसात एस.टी.पुर्वपदावर येईल असा विश्वास अधिका-यांनी व्यक्त केला आहे. नांदेड विभागात एकुण ३ हजार २०६ कर्मचारी आहेत. त्यापैकी १ हजार ५०० कर्मचारी अत्तापर्यंत कामावर हजर झाले आहेत. आणखी जवळपास ५० टक्के कर्मचारी गैरहजर आहेत. २२ एप्रिलपर्यंत ९० टक्के कर्मचारी हजर होतील असा विश्वास कर्मचा-यांनी व्यक्त केला आहे.
एस.टी.महामंडळाच्या संपामुळे खाजगी वाहतुकदारांनी मोठ्या प्रमाणात भाडे वाढ केली होती. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा नाहक त्रास झाला. पाच महिन्यापासून संप सुरु असल्यामुळे गोरगरीब जनतेला या संपाचा चांगलाच फटका बसला आहे. मात्र खाजगी वाहतुक धारकांनी मनमानी भाडे अकारुन सर्वसामान्य जनतेची लुट केली आहे. याला जवाबदार शासन राहणार असून लवकरच संप मिटवून एस.टी.पुर्ववत करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.