29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeनांदेडमराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्नांची गरज: कुलगुरू

मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्नांची गरज: कुलगुरू

एकमत ऑनलाईन

नांदेड: प्रतिनिधी
मराठी भाषेमध्ये सर्व विद्याशाखांमधील अद्ययावत ज्ञान उपलब्ध झाले पाहिजे. मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून समाजाने स्वीकारले पाहिजे, तिच्या संवर्धनासाठी काळानुरूप प्रयत्नांची गरज आहे. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.

विद्यापीठातील भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल, ज्ञान स्रोत केंद्र आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सुरुवात ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करून कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ज्ञान स्रोत केंद्रात आयोजित अभिजात मराठी ग्रंथांच्या प्रदर्शनाची कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी प्रारंभी पाहणी केली. मराठी भाषेतील अभिजात ग्रंथांसमवेत संतवाङ्मय, लोकसाहित्य, शब्दकोश, परिभाषाकोश, विश्वकोश प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. केशव सखाराम देशमुख, डॉ. पृथ्वीराज तौर आणि डॉ. पी. विठ्ठल यांचा यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत विद्यापीठात ऑनलाईन पद्धतीने दि. २८ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त संख्येने रसिकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. शैलजा वाडीकर यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेश काळे यांनी केले. तर ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदिश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. रमेश ढगे, डॉ. योगिनी सातारकर, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. नीना गोगटे, प्रा. जीशान अली, जी. ए्न. लाटकर, डॉ. अरुण हंबर्डे, सायलू नरोड, संदिप डहाळे यांच्यासह ग्रंथालय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या