नांदेड : प्रतिनिधी
मराठी साहित्य संस्कार मंडळातर्फे वाकोडी ता. कळमनुरी येथे दि. १८ एप्रिल रोजी होणा-या मराठी साहित्य संस्कार संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक शंकर वाडेवाले यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे उद्घाटन नामवंत कादंबरीकार बाबाराव मुसळे यांच्या हस्ते होणार आहे.
मराठी साहित्याचे संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहचावेत, त्यांच्यात रुजावेत, शालेयस्तरावरून नव्या साहित्यिकांची पिढी घडावी या उद्देशाने इसाप प्रकाशनाद्वारे संचालित मराठी साहित्य संस्कार मंडळाच्या वतीने महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी साहित्य संस्कार संमेलने घेण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत वाकोडी येथे हे पहिले संमेलन घेण्यात येणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक शंकर वाडेवाले यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच उद्घाटक म्हणून नामवंत कादंबरीकार बाबाराव मुसळे यांची निवड झाली आहे. त्यांच्या कादंब-या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला लावण्यात आल्या आहेत. या बैठकीस डॉ. संतोष कल्याणकर, उपसरपंच शिवाजी भवर, विजय गं. वाकडे, प्रा. राजाराम बनसकर, रविकांत कदम, पुंजाजी काकडे, एस. एस. देशमुख, प्रा. के. एस. भवर, सुभाष डाखोरे, विकास जाधव, श्रीमती ओ. बी. जाधव, पंडित नरहरे, दुर्गादास नाईक आदी उपस्थित होते. या संमेलनास साहित्यिक व रसिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे, असे आवाहन उपसरपंच शिवाजीराव भवर व वाकोडी येथील शालेय व्यवस्थापन समितीने केले आहे.