19.6 C
Latur
Sunday, February 5, 2023
Homeनांदेडमहापालिकेत दिव्याखाली 'अंधार'; लाखो लिटर पाण्याची नासाडी

महापालिकेत दिव्याखाली ‘अंधार’; लाखो लिटर पाण्याची नासाडी

एकमत ऑनलाईन

नांदेड: प्रतिनिधी
उन्हाळ्याची चाहूल लागली असून, जिल्ह्यात अनेक गावांत पाणीबानीची परिस्थिती निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. पाण्याचा एक एक थेंब मिळवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू असताना, महापालिकेंच्या दिव्याखाली अंधार या म्हणी प्रमाणे नांदेड शहरात विविध ठिकाणी पाईपलाईनमधून होणा-या गळतीमुळे दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पाणी पुवरठा विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या नियोजन शून्य कारभाराचा ऐन उन्हाळयात नांदेडकरांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षी जिल्ह्यात काही प्रमाणात चांगला पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतेक सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यात नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरी येथील शंकर जलाशयदेखील तुडुंब भरला. मनपाने योग्य पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले तर निश्चित यावर्षी शहराला पाणीटंचाईची झळ जाणवणार नाही, मात्र सध्यातरी असे होताना दिसत नाही.

सद्यस्थितीत मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. कोटीतीर्थ ते नांदेड दरम्यान पाणीपुरवठा करणा-या जलवाहिनीचे वॉल काही नागरिकांनी काढल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत असून हसापूर शिवारात अनेक शेतात पाणी शिरल्याने पिकाचे नुकसान होत आहे.

याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या मात्र मनपाचा पाणीपुरवठा विभाग आणि त्याचा म्होरक्या कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे हे अद्याप कुंभकर्णी झोपेत आहेत. लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे यांच्या निदर्शनास आणूनदेखील याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. तसेच विष्णुपुरी ते एमआयडीसीकडे जाणा-या जलवाहिनीतूनदेखील गेल्या दोन ते तीन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. याकडेही मनपा प्रशासन काणाडोळा करत आहे. एवढेच नाही तर शहरातील मुख्य नागरी वस्ती असलेल्या आयटीआयजवळील लेबर कॉलनी येथे जवळपास मागच्या चार महिन्यापासून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गळत आहे. याबाबत झोपेचे सोंग घेतलेल्या मनपाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांना येथील स्थानिकांनी माहितीही दिली. मात्र माहिती मिळताच क्षणात काम करतील ते अंधारे कसले. त्यामुळे मागच्या चार महिन्यापासून येथे पाण्याची गळती सुरूच आहे.

एकूणच निसर्ग जेव्हा एखादी गोष्ट आपणाला भरभरून देतो आणि त्याचेच जर व्यवस्थित नियोजन करून वापर करता आले नाही तर त्यासाठी आपण निसर्गाला कसा काय म्हणून द्यावा, असा सवालही काही नागरिक करू लागले आहेत.
दरम्यान मनपातील सुग्रीव अंधारे सारख्या निष्क्रिय अधिका-यांच्या शून्य नियोजनामुळे जर शहरवासीयांना यापुढे पाणी टंचाईचा सामना करावा लागला तर यात नवल वाटायला नको.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या