नांदेड: विशेष प्रतिनिधी
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दोन अज्ञात मारेक-यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेला नऊ दिवस उलटूनही मारेक-यांचा शोध लागत नव्हता. या घटनेला वेगळे वळण देण्यासाठी एका महाभागाने बियाणी यांच्या घरी निनावी पत्र टाकून शहरात खळबळ निर्माण केली. पोलिसांवर विश्वास नसल्यामुळे बियाणी यांच्या मामांनी सदरील पत्राची प्रत माध्यमांना दिली होती. त्यामुळे पोलिसांची काही काळ दिशाभूल झाली. मात्र पोलीस यंत्रणा राबवून अति. पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी निनावी पत्राचा अवघ्या २४ तासात छडा लावून यातील आरोपीस ताब्यात घेऊन चर्चेला पूर्णविराम दिला असला तरी याबाबत असे बोलल्या जाते की, मामाचे पत्र हरवले… पोलीस स्थानकात सापडले.
नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ४ एप्रिल रोजी त्यांच्या घरासमोर हत्या करण्यात आली. त्या दिवसापासून पोलीस तपासात तहानभूक विसरून कामाला लागली. त्यामध्ये अचानक काल आलेल्या निनावी पत्रामुळे शहरात खळबळ निर्माण झाली. सकाळी ७ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत पोलीस विभाग सातत्याने काम करत असताना अचानक या पत्रामुळे नियमित कामकाजाला खोडा पडला आणि निनावी पत्राचा तपास करण्यासाठी तब्बल २४ तास पोलिसांचे वाया गेले असले तरी यातील आरोपी ताब्यात घेतल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. सदरील निनावी पत्र विठ्ठल संतराम सूर्यवंशी (वय ७४, रा.अटाळा ता.धर्माबाद) यांनी पांडुरंग येवले यांना सदर गुन्ह्यात खोडसाळपणे गुंतवण्यासाठी आणि पोलिसांकडून अटक व्हावी या हेतूने पाठविले. या दोघांमध्ये शेतीचा वैयक्तिक वाद असल्यामुळे येवले यांना त्रास व्हावा या हेतूने परभणी येथून हे निनावी पत्र पाठवल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौर यांनी दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठल सूर्यवंशी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
असे असले तरी खून प्रकरणाच्या तपासाचे आव्हान पोलिसांसमोर आहे. परंतु येत्या काही दिवसात त्याचाही उलगडा होण्याची चिन्हे दिसत आहेत. सर्व सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती असे सर्व हातखंडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक वापरत आहेत. तपास योग्य दिशेने व्हावा यासाठी पोलीस विभागाने चांगली टीम लावली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली आहे. त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र यंत्रणा देण्यात आली आहे.
यावर विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह गृहमंत्रालयातील अधिकारी या तपासावर लक्ष ठेवून आहेत. अवघ्या काही दिवसात या घटनेचा तपास लागावा यासाठी पोलीस विभागानेदेखील जनतेला आवाहन केले आहे. कुठलाही सुगावा लागल्यास तत्काळ पोलीस विभागाला कळवावे. जेणेकरून तपास मोहिमेला गती प्राप्त होईल व मुख्य आरोपी ताब्यात घेता येईल.