माहूर : प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यात सलग दोन दिवस दोन ठिकाणी मोठा हात मारल्यानंतर देव देव करत श्रीक्षेत्र माहूरगड येथे श्री रेणुका देवीचे चैत्रीय नवरात्र सुरू असल्याची संधी साधत देवीच्या दर्शनासाठी आलेल्या ८ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीला वर्धा पोलिसांनी माहूर पोलिसांच्या मदतीने श्री रेणुका देवी मंदिर पायथ्याच्या पाय-्या वर सापळा रचत मोठ्या शिताफीने अगदी फिल्मी स्टाईल पद्धतीने अटक केली. ही घटना दिनांक ७ एप्रिल रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान घडली. महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांना रात्रीच्या अंधारात लुटायचे आणि लूट फत्ते झाल्यानंतर अगदी साळसूदपणे सज्जन भाविक असल्याप्रमाणे वागत जणू काहीच घडले नाही अशा तो-्यात,केलेले पाप धुण्यासाठी अथवा लपविण्यासाठी आपल्या परीवारा सोबत देव दर्शनाला जायचे अशी गुन्ह्याची भन्नाट फिल्मी पद्धत असलेल्या दरोडेखोरांची हुशारी मात्र वर्धा जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मास्टर माईंड प्लॅन समोर फेल पडली.
वर्धा पोलिसांनी आपले जीव धोक्यात घालून स्थानिक माहूर पोलिसांच्या मदतीने ८ जणांच्या दरोडेखोर टोळीला श्री रेणुका देवी मंदिर पाय-्यावर सापळा रचत मोठ्या शिताफीने अटक केली. अंगावर शहारे आणणार्या या घटनेच्या कारवाईने गड परिसर पुरते हादरून गेले होते. श्री क्षेत्र माहूरगड येथील श्री रेणुकामाता मंदिरात सध्या चैत्र नवरात्र महोत्सव सुरु आहे. त्यामुळे दररोज दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ही संधी साधून दर्शनासाठी आलेल्या उस्मानाबादच्या आठ संशयित दरोडेखोरांना जेरबंद करण्याची धाडसी कार्यवाही वर्धा पोलिसांनी केली.
अटक केलेल्यांमध्ये सजेर्राव शिंदे, दत्ता शिंदे, बबलू शिंदे, सुनील काळे, अमोल शिंदे, लहू काळे, विकास शिंदे व महादेव काळे रा. उस्मानाबाद या ८ संशयित आरोपी विरुद्ध वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर व तळेगांव या दोन्ही पोलीस ठाण्यात कलम ३९४(३४)भा.दं.वि.नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून वध्यार्चे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात स. पो. नि. गजभिये, लगड, इंगळे, पो. उप नि. खोत यांचेसह वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धाडसी कार्यवाही केली. अधिक तपासासाठी वर्धा पोलिसांनी आठही आरोपीसह एम.एच.१३ ए सी ८०८२ क्रमांकाची बोलेरो व एम एच २५ आर ३९२७ क्रमांकाची एक्स व्ही व्ही ही दोन्ही वाहने जप्त करून सोबत नेली आहेत.
वर्धा व नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकांची सूचना मिळताच माहूर पोलिस स्टेशनचे स. पो.नि. संजय पवार, एस.बी. जगताप, पोहेकॉ विजय आडे, कॉ. प्रकाश देशमुख,सुशील राठोड, रामचंद्र इंगळे,गोपनीय शाखेचे शारदासूत खामणकर,महिला पोलीस पुसनाके व गृह रक्षक दलाच्या दोन्ही महिला कर्मचा-्यांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळ गाठल्याची माहिती माहूरचे पो.नि. नामदेव रिठ्ठे यांनी दिली. यातील एका संशयित आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी बंदूकीचा धाक दाखवून त्याला ताब्यात घेतल्याची घटना थरारक होती. अशी प्रतिक्रिया श्री रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिगंबर घोगरे पाटील यांनी दिली. एखाद्या चित्रपटाची शूटिंग तर होत नसावी ना असाही काही लोकांचा समज झाला
होता.