नांदेड : अपघातामधील लाच स्वीकारणा-या पोलिसाला एस. आर. कानगुले यांना तुरुंगात पाठवून त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी विशेष न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी सोमवार दि. २० मार्च रोजी निश्चित केली आहे.
भाग्यनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार एस. आर. कानगुले यांनी एका अपघात प्रकरणात ३ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यात १२०० रुपये लाच स्वीकारून उर्वरित १८०० रुपये लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना जेरबंद केले. विशेष न्यायाधीश एस.ई. बांगर यांनी कानगुलेला १५ मार्च ते १८ मार्च दरम्यान दोनदा तीन दिवसांची कोठडी दिली.
ही पोलिस कोठडी संपल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कानगुलेला न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरुंगात केली.
प्राप्त माहितीनुसार त्यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी न्यायालयाने आज सोमवार दि. २० मार्च रोजी निश्चित केली आहे. प्रकरणात कानगुलेच्यावतीने एड. अमित डोईफोडे बाजू मांडणार आहेत.