श्रीक्षेत्र माहूर : पोसा क्षेत्रात असलेल्या माहूर येथे शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदांचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे.माहूर शहरातील शासकीय कार्यालयांचा आढावा घेतला असता, बहुतांश कार्यालयांमध्ये रिक्त पदांमुळे कामे खोळंबली असल्याची माहिती मिळाली आहे. शहरातील सर्वच कार्यालयांना रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. परिणामी कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचा-यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. कार्यालयातील रिक्त पदे भरण्याकडे, लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.
नियमित कामे, पारदर्शी प्रशासन असे घोषवाक्य शासनाचे आहे. परंतु या घोषवाक्याचा फज्जा माहूर शहरात उडाल्याचे चित्र दिसत आहे. कारण तालुक्यातील मुख्य कार्यालयातील पदे रिक्त आहे. त्यामुळे कारभार प्रभारींच्या खांद्यावर असून तालुकावासीयांची अनेक कामे खोळंबली आहे.माहूर तालुक्याचे ठिकाण असुन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पद रिक्त असल्याने महत्वपूर्ण असलेल्या पोलीस खात्याच्या भार प्रभारीवर आहे.तर तालुका कृषी अधिकारी हे पद चार वर्षापासून रिक्त असल्याने त्या ठिकाणी ही प्रभारी राज आहे.शिक्षण विभागात ही गट शिक्षण अधिकारी प्रभारी आहे.तर मागील दोन वर्षापासून बाल विकास प्रकल्प अधिका-याचे पद रिक्त असल्याने तो ही विभाग प्रभारी वर भार असल्याने कुपोषित झाला आहे.
तर तहसील कार्यालयात अनेक महत्वाची पदे रिक्त आहे.कृषी विभागात तर रिक्त आणि सैराट कर्मचा-यांचा भरणा असल्याने हा विभाग शेतक-यांच्या हिता साठी नव्हे तर शासकीय योजनेची वाट लावण्यासाठी असल्याची प्रचिती येत आहे.तालुका आरोग्य विभागात कोठे एम.बी.बी.एस डॉक्टर नसल्याने बी.ए.एम.एस कडे वैद्यकीय अधिकारी पदाचा चार्ज आहे.तर कुठे दोन पैकी एक डॉक्टर रिक्त आहे.पाच ही प्राथमिक आरोग्य केंद्रात अप डाऊन करणा-यांची संख्या लक्षणीय आहे.तर माहूर ग्रामीण रुग्णालयातील चित्र भयावह असून जैसी राजा वैसी प्रजा या उक्ती प्रमाणे दांडी बहाद्दर अधिका-यांच्या पाठोपाठ कर्मचारी ही तोच कित्ता गिरवत आहे.
तीर्थक्षेत्र माहूर नगरपंचायत चा पदभार पण नायब तहसीलदार यांच्याकडे असल्याने नगरपंचायतची कामे खोळ बत असल्याची प्रचिती नागरिकांना येत असून प्रभारी मुख्याधिकारी रिस्की काम टाळत असल्याने मोठ्या प्रमाणात वसूल होणार टॅक्स ची नाममात्र वसुली होत आहे.इतर विभागाची परिस्थिती या पेक्षा वेगळी नसून जिल्हाधिकारीकिंवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, अथवा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट हे प्रशासकीय अधिकारीकिंवा लोकप्रतिनिधी अचानक कार्यालयाला भेटी देत नसल्याने कर्मचारी व अधिकारी यांना चांगलेच फावले आहे.