नांदेड: प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक कामात भ्रष्टाचार होत आहे. तीन वर्षांपूर्वी बोगस डांबर चलन लावून कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही केवळ कंपनीचे नाव बदलून त्याच व्यक्तींना कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. सा.बां. विभागातील अधिकारी अशा कामांमधून पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची फसवणूक करीत आहेत, असा घणाघाती आरोप आ. प्रशांत बंब यांनी केला.
आमदार प्रशांत बंब हे कथित डांबर घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जबाब नोंदवण्यासाठी सोमवारी नांदेडात आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. पुढे आ.बंब म्हणाले की, तीन वर्षापुर्वी नांदेड जिल्ह्यात सा.बां.विभागात मोठ्या प्रमाणात डांबर घोटाळा झाला होता. बोगस डांबर चलन लावून कंत्राटदारांनी कोट्यवधी रूपयांचा घोळ केला. सततच्या तक्रारीमुळे या प्रकरणात संबधीत कंपनीच्या व्यक्तीविरोधात एफआरआय दाखल झाला. यानंतर त्यांच्याकडून काम काढून घेण्यात आले.
मात्र एका रात्रीत दुसरी कंपनी स्थापन करून जी.जी कन्स्ट्रक्शनची गार्गी अॅन्ड गार्गी या नावाने कंपणी स्थापन करून पुर्वीच्या कंपनीची सर्व बॉडी या कंपनीत घेण्यात आली आणि यांनाच पुर्वीचे ३२ कोटीला दिलेले टेंडर आठ दिवसांनी ३८ कोटीला देण्यात आले. हा अंत्यत गंभीर प्रकार आहे,ही बाब उघड झाल्यावर याचीच तक्रार मी केली होती. पुढे या प्रकरणाची एसीबी, गृहमंत्री, सा.बां.विभागाकडे तक्रार करूनही याची तीन वर्षापासून साधी चौकशीची करण्यात आली नाही. पुरावे देवूनही मंत्री चौकशी करीत नाहीत. जर पाच-सहा वर्षापासून केलेल्या तक्रारीचे मंत्री उत्तर देत नसतील तर लोकांचा पैसा त्यांना लुटू देणार नाही. माझ्या तक्रारीत तथ्य आहे, पुरावे असूनही उत्तर दिल्या जात नाही. विधानसभेत मांडलेल्या प्रश्नांवरही कुठलीच कारवाई होत नाही. अखेर याबाबत एसीबीकडे दाखल झालेल्या तक्रारीत जबाब देण्यासाठी अधिका-यांनी बोलविले होते. यासाठी नांदेडात आलो असे सांगितले.
राज्याचे बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातच बांधकाम खात्यात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. ना. चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघातील १०० मीटरचा एखादा रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे केल्याचे दाखवले तर मी आमदारकी सोडेन. एवढंच काय तर आयुष्यात पुन्हा राजकारण करणार नाही, असा इशाराही आमदार प्रशांत बंब यांनी दिला आहे. गेल्या तीन वर्षांपासून आ.प्रशांत बंब हे सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनेक तक्रारीचा पाठपुरावा करत आहेत. त्याच अनुषंगाने एसीबीने बंब यांना त्यांच्याकडचे पुरावे सादर करण्यासाठी बोलावले होते. सोमवारी त्यांनी एसीबी कार्यालयात पुरावे सादर केले. यावेळी आ.बंब यांचे म्हणणे देखील अधिका-यांनी नोंदवून घेतले आहे.