23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeनांदेडनांदेडकरांना २९ एप्रिल ते १ मे दरम्यान सांस्कृतिक मेजवानी

नांदेडकरांना २९ एप्रिल ते १ मे दरम्यान सांस्कृतिक मेजवानी

एकमत ऑनलाईन

नांदेड: विशेष प्रतिनिधी
नांदेडकरांसाठी लोकोत्सवानंतर प्रथमच महापालिकेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातील आमदारांच्या स्थानिक निधीतून ९० लाखाचा निधी प्राप्त होत असल्यामुळे महापालिकेवर आर्थिक व्यवस्थापनाचा ताण पडणार नाही. हा कार्यक्रम २९ एप्रिल ते १ मे च्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. चला हवा येऊ द्या, हिंदी कविसंमेलन, भीमगीतांच्या कार्यक्रमासह शंकरराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. यानिमित्ताने नांदेडकरांना सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. प्रथमच सर्वच आमदारांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून महापालिकेच्या रौप्य महोत्सवासाठी वाटा उचलल्यामुळे असे बोलल्या जात आहे की, रौप्य महोत्सव महापालिकेचा : खर्च आमदारांचा, करमणूक नागरिकांची!

याप्रसंगी बोलतांना जयश्री पावडे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात नांदेडच्या संस्कृतीचे वैभव ज्ञात आहे. महानगरपालिकेची स्थापना २६ मार्च १९९७ रोजी झाली. त्याला आता २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या संकल्पनेतून रौप्यमहोत्सव २०२२ साजरा करण्याचे ठरले. त्यात मराठवाडा विभागातील कला, क्रीडा, आरोग्य, प्रशासन, समाजसेवा, राजकारण, साहित्य, पत्रकारीता, संगीत, उद्योग, समाजप्रबोधन या क्षेत्रातून जीवनगौरव पुरस्कारासाठी एका व्यक्तीची निवड करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यात पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांची निवड यांची निवड झाली. त्यांनी कोविड काळातील केलेल्या संशोधनात त्यांचे नाव जगभर गाजले आहे. त्यांना या पुरस्कारात १ लाख रुपये मानधन आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम कुसूम सभागृह येथे दि.२९ एप्रिल रोजी सकाळी १० वा. आहे. याच दिवशी सायंकाळी ६ वाजता यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर ‘चला हवा येऊ द्या’ हा हास्य विनोदी कार्यक्रम होणार आहे. यात भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांच्या संचास आमंत्रित करण्यात आले आहे. दि.३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर हिंदी हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात कवी सबीना, समपत सराळ, घनश्याम अग्रवाल, किरण जोशी, रसबिहारी हे येणार आहेत. दि.१ मे रोजी सायंकाळी ६ वाजता आदर्श शिंदे आणि त्यांचा संच भिमगितांचे सादरीकरण करणार आहेत. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांची ख्याती पाहता त्यांच्यासाठी कार्यक्रमस्थळ नंतर जाहीर होणार आहे. कारण त्यांच्या कार्यक्रमात होणारी लक्षणीय गर्दी पाहता योग्य कार्यक्रमस्थळ निश्चित केले जाणार आहे.

रौप्य महोत्सव-२०२२ मध्ये मराठी साहित्य संमेलन, मुशायरा आणि घनकचरा व्यवस्थापन हे कार्यक्रम सुद्धा कालांतराने होणार आहेत. या कार्यक्रमाचा खर्च लक्षात घेता त्यास ९० लाखांचा निधी अपेक्षित आहे. त्यासाठी विधानसभा व विधान परिषद सदस्यांकडून प्रत्येकी १० लाख रुपये निधी घेतला जात आहे. त्यास आ.मोहन हंबर्डे, आ.बालाजी कल्याणकर, आ.माधवराव पाटील जवळगावकर, आ.विक्रम काळे आदींनी हा निधी देण्याचे मान्य केले आहे. हा निधी देण्यासाठी नांदेडच्या जिल्हाधिका-यांकडे विनंती करण्यात आली आहे. जनतेने या रौप्य महोत्सव-२०२२ मधील कार्यक्रमांना उपस्थित राहून नांदेडच्या सांस्कृतीक वैभवाचे दर्शन घ्यावे आणि मोठ-मोठ्या कलाकारांद्वारे सादर होणा-या कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापौर जयश्री पावडे, आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहन हंबर्डे यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला माजी मंत्री डी.पी.सावंत, उपमहापौर अब्दुल गफार, सभापती किशोर स्वामी, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त पंजाबराव खानसोडे, आनंद चव्हाण यांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या