नांदेड : प्रतिनिधी
इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शास्त्री मार्केट भागातील एक नामांकीत कापड दुकान फोडून चोरट्यांनी नगदी २५ हजार रूपये, एक मोबाईल आणि इतर साहित्य लंपास केल्याची घटना गुरूवारीच्या रात्री घडली.
शहरात दिवसेंदिवस घरफोडी, लुटमार जबरी चोरी, दरोडा अशा घटना वाढतच आहेत. दिवसभरात किमान दोन चोरीच्या घटनाची नोंद पोलिसात होत आहे. सतत वाढणा-या चोरीच्या घटनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान गुरूवार दि.९ रोजीही रात्री चोरट्यांनी एक कापड दुकान फोडले. इतवारा पोलिस ठाणे हद्दीत असणा-या शास्त्री मार्केट भागात कासलीवाल कापड दुकान आहे.
सदर भागात नागरिकांची चांगली वर्दळ असते तसेच या भागात पोलिसांची रात्रीची गस्तही असते असे असताना चोरट्यांनी गुरूवारी मध्ये रात्री सदर दुकानाच्या छतावरील एका जाळीचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुकानात असलेली नगदी २५ हजार रूपयाची रक्कम आणि १ मोबाईल चोरून नेला. या व्यतिरिक्त आणखी कितीचा इतर मुद्देमाल चोरीस गेला हे अद्याप कळू शकले नाही.
चोरट्यांनी केलेल्या चोरीवरून दुकानाची माहिती असणा-यांनीच सदर चोरी केल्याचे निदर्शनास येत आहे. या घटनेबाबत इतवारा पोलिसांशी संपर्क केला असता ठाण्यात अद्याप गुन्हा नोंद झाला नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. चोरी झालेल्या भागात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही असल्याने या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना चोरट्यांचा शोध घेता येणार आहे. वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने शहरातील व्यापारीही भीतीच्या सावटाखालीच जगत आहेत. इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतच सराफा मार्केटही असल्याने सराफा विक्रेते चिंतेत आहेत. त्यामुळे दिवसेदिवस वाढणा-या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस विभागाने काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी व्यापा-यांतून होत आहे.