नांदेड : प्रतिनिधी
हॉटेलसमोर रस्त्यावर पानपट्टी टाकायची असेल तर अगोदर २५ हजार आणि नंतर दरमहा १० हजार रुपये हप्ता तथा खंडणी द्यावे लागेल असे म्हणून चार जणांनी एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
ईश्वर मारोतीराव हंबर्डे हे दि. ७ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्यासुमारास समाधान हॉटेल विष्णुपूरी समोर पानपट्टी टाकण्यासाठी जागा पाहत होते. त्यावेळी तेथे प्रभाकर शंकर हंबर्डे, अविनाश भारती, मोन्या आणि संतोष उर्फ सोन्या हे चार जण आले.
यातील प्रभाकर हंबर्डेने तुला येथे पानपट्टी टाकायची असेल तर अगोदर २५ हजार आणि त्यानंतर दरमहा १० हजार रुपये असे हप्ते मला द्यावे लागतील असे सांगितले. जागा तुझ्या मालकीची नाही मग तुला पैसे कशाला देवू असे ईश्र्वर हंबर्डे म्हणाले. यावर त्या चौघांनी मिळून ईश्वरच्या शरिरावर खंजीरने अनेक ठिकाणी वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलिसांनी चार जणांविरुध्द कलम ३०७, ३८४, ३४ आणि भारतीय हत्यार कायद्यानूसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरिक्षक महेश कोरे हे करीत आहेत.