21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeनांदेडमास्क हे व्हेंटिलेटर लावण्यापेक्षा चांगले आहे...!

मास्क हे व्हेंटिलेटर लावण्यापेक्षा चांगले आहे…!

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अतिगंभीर रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढत आहे. ही सततची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने ऑनलाईन काव्यपौर्णिमा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खबरदारीचा उपाय हीच कोरोनाची शृंखला तोडून टाकू शकते. जनतेने मास्क, शारिरिक अंतर आणि सॅनिटाईझर या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे अवलंब करावा.,असे सांगत कवींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून मास्क हे व्हेंटिलेटर लावण्यापेक्षा चांगले आहे असा संदेश दिला.

गूगल मीटवर घेण्यात आलेल्या काव्यपौर्णिमेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री शेख अनिसा , ज्येष्ठ कवी शरदचंद्र हयातनगरकर, काव्यपौर्णिमेचे संकल्पक गंगाधर ढवळे यांची उपस्थिती होती. येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने फाल्गून पौर्णिमेनिमित्त ऑनलाईन पद्धतीने काव्यपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. काव्यपौर्णिमा मालेतील एकोणचाळीसाव्या काव्यपौर्णिमेचे ऑनलाईन उद्घाटन तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन लोखंडे परिवाराच्या हस्ते करुन प्रज्ञा करुणा विहार देगावचाळ येथे ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात आले.

त्यानंतर घेण्यात आलेल्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमात कवींनी सहभाग नोंदवून कोरोनाविषयक ऑनलाईन जनजागृती केली. याद्वारे सर्वत्र पोहचविण्याचा मनोदय व्यक्त केला. ज्येष्ठ कवी अनुरत्न वाघमारे यांनी मुसकं बांध रं पोरा ही कविता सादर करुन कविसंमेलनाचा आगाज केला. काव्यपौर्णिमेत कवी शरदचंद्र हयातनगरकर यांनी आता आपण कोरोनाचे श्राद्धं घालावयास पाहिजे अशी भूमिका घेतली तर शेख अनिसा यांनी होळी आणि रंगधूळ यांच्या संगमातून कोरोनाला जाळून नवयुगाचा रंगोत्सव खेळूया अशी भावना व्यक्त केली.‌

काव्यपौर्णिमेचे संकल्पक गंगाधर ढवळे यांनी सहभागी होतांना मृत्यू शोधात आहे जीवनाच्या आणि जीवन मृत्यूकडे प्रवासत चालले आहे अशा आशयाची कविता सादर केली. बी. सी. पाईकराव यांनीही कोरोना रोखता येईल आणि कायमस्वरूपी आपण त्याला मूठमाती देऊ शकतो हा आशावाद व्यक्त केला. ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांनी होळी पेटवू या कोरोनाची ही गेय कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून घरीच राहा आणि काळजी घ्या हा संदेश आपल्या कवितांमधून दिला. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन कवी नागोराव डोंगरे यांनी केले. प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी तर आभार बी. सी. पाईकराव यांनी मानले. सदरील कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने प्रसारित करण्यासाठी मंडळाचे पांडूरंग कोकुलवार, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, रुपाली वैद्य वागरे, सुभाष लोखंडे, शिल्पा लोखंडे यांनी परिश्रम घेतले.

राज्‍यात निर्बंध अधिक कडक करणार – राजेश टोपे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या