नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरू झाला आहे. बियाणी यांची पत्नी अनिता बियाणी यांनी संपत्तीत वारसदार असल्याचा दावा केल्यानंतर आता आणखी एका महिलेने माझी चार वर्षांची मुलगी संजय बियाणी यांच्या संपत्तीची वारसदार असल्याचा दावा न्यायालयात केला आहे.
यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून महिलेच्या या अर्जावर दि़ २४ जून रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. दि. ५ एप्रिल रोजी संजय बियाणींची त्यांच्या घराबाहेर अज्ञात मारेक-यांनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणात आतापर्यंत एसआटी पथकाने १२ आरोपींना पकडले असले तरी मुख्य दोन मारेकरी निष्पन्न होणे बाकी आहे.असे असताना आता संजय बियाणींच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असून पत्नीशिवाय आणखी एका महिलेने वारसदार असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.
सदर महिलेने आपली चार वर्षाची श्रद्धा ही मुलगी संजय बियाणी यांच्या संपत्तीची वारसदार असल्याचे सांगत अनिता बियाणी यांनी केलेल्या वारसाच्या दाव्यावर आक्षेप घेतल्याने बियाणी कुटुंब पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहे. काही दिवसांपूर्वी संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी आणि संजय बियाणी यांचा भाऊ प्रवीण बियाणी यांच्या मधील आर्थिक वादही चव्हाट्यावर आला होता.