नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात सतत होणा-या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तुर, उडीद, मूग, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त पिकांची कृषी मंत्री दादा भुसे यांनी रविवारी नांदेड तालुक्यातील मालेगाव, कासारखेडा व पासदगाव शिवारात भेट देऊन पाहणी केली.या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास दिले असून हा अहवाल राज्य- केंद्र सरकारला अहवाल पाठविणार असल्याचे कृषी मंत्री भुसे यांनी यावेळी सांगीतले.
कृषीमंत्री भुसे रविवार दि.२७ रोेजी हिंगोली जिल्ह्याचा दौरा आटोपून लातूरकडे जाण्यापूर्वी नांदेडला येतांना अनेक ठिकाणी थांबून त्यांनी शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्यासोबत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव, नांदेड तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकले, अधार्पूर तालुका कृषी अधिकारी अनिल शिरफुले यांची उपस्थिती होती.
यावेळी शेतक-यांना कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी धीर देत जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याचबरोबर ज्या शेतक-यांनी विमा काढला आहे त्या शेतक-यांना विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल याबाबत दक्षता घेण्याचे आदेश कृषि विभागाला दिले. परभणी, हिंगोली आणि आता नांदेड येथील अतिवृष्टीच्या भागात मी पाहणी करत असून लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सर्व जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. शासनस्तरावरुन याबाबत आम्ही योग्य तो विचार करत असून केंद्र सरकारला लवकरच याबाबत आहे ती वस्तुस्थिती मांडून शेतक-यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात मागील काही दिवसांत अतिवृष्टी झाल्याने पावसाने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले असले, तरी शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती असल्याचे कबूल करत शेतक-यांना मदतीसाठी वाटेल ते करु पण मदत करु, असेही ते म्हणाले. नांदेड जिल्ह्यात सतत होणा-या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तुर, उडीद, मूग, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून झाली आहे.मात्र नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे कधी पुर्ण होतील आणि नुकसान भरपाई कधी मिळेल याकडे शेतक-यांचे डोळे लागले आहेत.
मुखेडात शेतक-यांनी कृषिमंत्र्यांचा ताफा अडविला
ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतक-यांकडून मुखेडमध्ये कृषिमंत्री दादा भुसे यांचा ताफा अडवण्यात आला. मंत्री भुसे हे अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी नांदेड दौ-यावर आले आहेत. मुखेड येथील शेतीची पाहणी करण्यासाठी गेले असता ही घटना घडली. यावेळी भुसे यांनी गाडीतून उतरून मागण्यांसंदर्भात निवेदन घेत पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करू, अशी शेतक-्यांना ग्वाही दिली. मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. मूग, उडीद, पिकांसोबतच सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे, शेतकरी सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. नांदेड तालुक्यातील पिकांची पाहणी केल्यानंतर ते मुखेड तालुक्यात पोहोचले. मात्र, संतप्त शेतक-यांनी दादा भुसे यांचा ताफा अडवला.