23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeनांदेडसत्ताधा-यांना विरोधक नसल्यामुळे नांदेड महापालिकेत मनमानी वाढली

सत्ताधा-यांना विरोधक नसल्यामुळे नांदेड महापालिकेत मनमानी वाढली

एकमत ऑनलाईन

नांदेड : महापालिकातंर्गत मालमत्ता कर न भरल्यास दंडात्मक कारवाईची मोहिम महापालिकेने सुरु केली आहे. त्यामुळे अनेक नांदेडकरांनी मालमत्ता कर स्वयंस्फुर्तीने भरला. अशा नांदेडकरांना महापालिका मात्र दोन दिवसाआड पाणी, रस्त्यांची दुरावस्था, दिवाबत्ती गुल अशा कुठल्याही सुविधा न पुरवता मालमत्ता कर मात्र शंभर टक्के भरला पाहिजे असे आवाहन करत आहे. त्यामुळे मालमत्ता कर भरा, रस्त्याची दुरावस्था सहन करा असे म्हणण्याची वेळ आली आहे. महापालिकेत कॉंग्रेसला पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आवाहनावर एकहाती सत्ता दिली. त्यानंतर आजतगायत नांदेडकर मात्र नाहक यातना सहन करत आहेत. याचे एकमेव कारण महापालिकेत विरोधक नसल्यामुळे मनमानी चालु असल्याचे उघड दिसत असल्यामुळे नांदेडकरांतून संताप व्यक्त होत आहे.

नांदेड वाघाळा शहर महापालिकेतंर्गत असलेले रस्ते व सा.बां. विभागाला वर्ग केलेले सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. शहरात आज खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था निर्माण झाली आहे. गेल्या आठवडा भरात पावसाने कहर केल्यामुळे अजून रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. लोकप्रतिनिधिंच्या प्रभागात रस्ता की खड्डा अशी अवस्था निर्माण झाली आहे. महापालिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाल्यामुळे महापालिका एकीकडे मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांवर जोरजबरदस्ती करत आहे. कुठलीच मुलभूत सुविधा न पुरवता मालमत्ता कर भरा असे आवाहन करत आहे.सत्ताधा-यांनी नजिकच्या काळात नांदेडचा कायापालट होणार असल्याची वल्गना करत आहेत.

दरदिवशी नवीन वास्तुचे उदघाटन करत असतांना नांदेडकरांनो जरा धिर धरा… लवकरच नांदेड शहर एका तपानंतर पुन्हा एकदा नवीन रुप धारण करणार असल्याचे सत्ताधारी लोकप्रतिनिधी सांगत आहेत. परंतु तोपर्यंत अनेक नांदेडकरांना मनक्यांचा त्रास, किरकोळ अपघाताला सामोरे जावे लागत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे दरदिवशी अपघात घडत आहेत. पालकमंत्र्यांनी सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर शहरातील अनेक रस्ते महापालिकेकडे वर्ग करुन घेतले होते. परंतु लगेच सुप्रिम कोर्टाच्या निकालात बदल झाल्यानंतर पुन्हा तेच रस्ते सा.बां.विभागाकडे वर्ग करण्यात आले. त्यामुळे महापालिका शहरातील अनेक रस्ते सा.बां. विभागाचे असल्यामुळे दुरुस्त करता येत नाहीत असे सांगत आहेत तर सा.बां. विभाग सांगत आहे की, खड्डे पडलेले सर्व रस्ते महापालिकेचे आहेत. या दोघाच्या वादात नांदेडकरांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

महापालिकेतील बोटावर मोजण्याइतके विरोधक असल्यामुळे ते देखील आळी मिळी गुपचिळी अशा पध्दतीने वागत आहेत. केवळ ७ नगरसेवक विरोधक असल्यामुळे त्यांचा आवाजही दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. किमान भविष्यात तरी नांदेडकरांनी एकहाती सत्ता देऊ नये असे मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या