माहूर (ता.प्र.) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात जाणीवपूर्वक आडकाठी घालून पैशाची मागणी केल्या प्रकरणी माहूर पं.स.चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संजीव प्रभू राठोड यांना सेवेतून बडतर्फ करा, अन्यथा त्यांची अन्यत्र बदली करा अशा आशयाची तक्रार तालुक्यातील काही सरपंचांनी दि.११ मे रोजी केली होती. त्यानुषंगाने गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे यांनी पं. स.चे सहाय्यक गटविकास अधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश बजावल्याने तक्रारकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संजीव प्रभू राठोड हे मनरेगा अंतर्गत कामाची कुठलीही माहिती देत नाहीत, ग्रामपंचायत मधील कामास अचानक भेटी देऊन लाभधारकांना अमाप पैशाची मागणी करतात, पैसे दिले नाही तर कामाबाबत खोट्या तक्रारी करण्याच्या धमक्या देतात, कामानिमित्त पं. स. ला भेट दिली असता असभ्य वर्तन करतात, विविध विकास कामाच्या संचिका /ई मस्टर मागणीवर जाणीवपूर्वक स्वाक्ष-या करण्यास नकार देतात,प्रत्येक मस्टर मागे एक किंवा दोन हजार रुपयाची मागणी करतात, जिओ टॅगिंगचे फोटो मान्य करीत नाहीत,पैशा शिवाय कुशल देयके संचिकेवर सह्या करण्यास नकार देतात, मनरेगा कामी मदत करणा-या कार्यालयीन कर्मचा-यांना दमदाटी करून त्यांच्याशी हुज्जत घालतात, गावात गट तट निर्माण करतात,विविध कामाबाबत गावक-यांना कार्यालयीन गोपनीय माहिती देऊन खोट्या तक्रारी करायला लावतात असे गंभीर आरोप सरपंचांनी केले आहेत. तक्रारीवर देवीस्ािंग केशव राठोड (तांदळा), पुरणसिंग सुंदरस्ािंग राठोड (लोकरवाडी ), अनिता जनार्धन धुर्वे (वायफणी), रेणुका गोव्ािंद कुमरे या सरपंचांच्या स्वाक्ष-या आहेत.
कुशल कामाची संचिका माझ्याकडे येत नाही, कुठल्याही कामाची अडवणूक केली नाही तसेच कुणाकडेही पैशाची मागणी केली नाही. मजुरांनी कामाची मागणी केल्यामुळेच काही गावात ग्रामपंचायतने वार्षिक आराखड्यात तरतूद केली त्यापेक्षा अधिकच्या शेततळ्याला मंजूरी दिली आहे. माझ्या तक्रारी मागे वरिष्ठांचे षडयंत्र दडले असल्याचा दावा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संजीव राठोड यांनी केला आहे.
त्यांच्या बाबत अनेक तक्रारी आहेत,सरपंचांच्या तक्रारीवरून त्यांना खुलासा सादर करण्याचे सूचना पत्र दिले आहे, असे गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे यांनी सांगितले. एकंदरीत सरपंचांनी सहाय्यक कार्यक्रम अधिका-यावर गंभीर आरोप केल्याने तसेच तक्रार करण्यामागे वरिष्ठांचे षडयंत्र असल्याचा संजीव राठोड यांनी संदेह व्यक्त केल्याने माहूर पंचायत समितीचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.